डोंबिवली (शंकर जाधव)
एक्सप्रेस गाड्यामध्ये रात्रीच्यावेळी महिला प्रवाशांच्या पर्स व बँग चोरीच्या तक्रारी वाढत होत्या. वाढत्या ह्या गुन्ह्यांना आळा बनविण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी तपास सुरू केला.कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखाने या प्रकरणी चौघांना अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, रवी दशरथ गायकवाड, गणेश सुरेश राठोड, ऊर्फ गोल्या, प्रकाश आश्रुबा नागरगोजे, तानाजी शिवाजी शिंदे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे,पोलीस उप आयुक्त, मध्य परिमंडळ, लोहमार्ग मनोज पाटील यांनी गुन्हे शाखाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशूद्दीन शेख यांना गुन्ह्यातील आरोपींना अटक करून मालमत्ता हस्तगत करण्याचे आदेश दिले होते. गुन्हे शाखा युनिट-3, कल्याण लोहमार्ग, मुंबई येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी स्टेशन परिसरात दाखल असलेल्या गुन्ह्यांचे समातंर तपासणी करत सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम सुरू केले.
याच दरम्यान एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये चार इसम हे रेल्वे प्लॅटफॉर्मवर संशयितरित्या वावरत असताना दिसून आले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व माहितीच्या आधारे तपास करून चौघा आरोपींना बेड्या ठोकून गजाआड केले. अटक केलेल्या चौघांकडून 9,41,998 रुपये किमतीचे सोने-चांदीचा ऐवज व ५ मोबाईल असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.