आता शीर्षक वाचून अंदाज आलाच असेल कि आर्ट (art) म्हणजे कला. तर बघुयात या कलेचा उगम आणि फायदा..
मंडल हा संस्कृत भाषेतून घेतलेला शब्द आहे. मंडल चा मराठी अर्थ आहे वर्तुळ. म्हणजेच गोलाकार नक्षीकाम असे आपण सोप्या भाषेत म्हणू शकतो. ही कला सामान्य नाही – जशी चित्रकला किंवा हस्तकला असते. याचे वैज्ञानिक स्पष्टीकरण आहे; जे आपण पुढे याच लेखात पाहणार आहोत.
त्या आधी जाणून घेऊया मंडला आर्ट बद्दल थोडीशी माहिती..
मंडला आर्ट मध्ये सुबक पण सममिती प्रकारचे नक्षीकाम केलेले असते. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे एका बिंदूपासून सुरुवात करून शेवटी गोलाकारच आकार पूर्ण होतो. बिंदू म्हणजे टिंब. याचाच अर्थ तुम्ही कोणत्याही बिंदूपासून सुरुवात केली असता ही कला तेव्हाच पूर्ण होणार जेव्हा याचा शेवट संपूर्ण वर्तुळकार अथवा गोलाकार अशी परिपूर्ण कला रेखाटून होईल. म्हणजे ही कला स्वतः मध्ये एक परिपूर्ण अशी कला आहे असे म्हणायला हरकत नाही.
सर्वप्रथम मंडला आर्ट – एक कला या दृष्टीने बघितले गेले; ते बौद्ध धर्मीय कले मध्ये जी पहिल्या इसवी सन पूर्व शताब्दी मध्ये भारतात निर्माण केली गेली. भारतीय घराघरांत या कलेचे दर्शन होते, कसे..? अहो आपण दरवाजासमोर सणांना सुंदर रांगोळी रेखाटतो त्यातून.
आता आपण पाहणार आहोत; मंडला आर्ट चा संबंध कुठे, कसा आणि त्याचा काय अर्थ आहे..
हिंदू धर्मात श्रीयंत्र सारखे यंत्र वापरले जाते तिथे आपल्याला मंडला आर्ट पाहायला मिळेल. नवग्रह मंडल देखिल याच प्रकारात मोडते. ब्रह्मांड देखील गोलाकार असते. प्रत्येक जीवित व्यक्तीचा प्रत्येक सूक्ष्म गोष्ट आणि त्या व्यक्तीशी संबंधित सर्व पार्श्वभागांशी संबंध असतो, हे मंडल सुचवते. बौद्ध धर्मानुसार बुद्धी आणि नश्वर जग या कलेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
आधुनिक विज्ञान देखील मंडला आर्ट बाबतीत बऱ्याच प्रमाणात सहमत आहे कि मानवी मनातील विचारांचा खेळ हे आर्ट वापरून आपण जाणून घेऊ शकतो, तसेच मंडला आर्ट चा खोलवर अभ्यास केला तर व्यक्तिमत्व ओळखू शकतो, म्हणजेच मनोविकारग्रस्त रुग्णांना देखील बरे करण्यासाठी एक प्रकारे या कलेचा वापर केला जाऊ शकतो.
वरील सर्व माहिती नमूद करण्याचा उद्देश असा आहे कि मंडला आर्ट चे होणारे फायदे हे कशा प्रकारे आपल्या शरीरावर होतात, हे समजून घेतले ते ही कला शिकणे सोपे होईल. आता आपण बघूया
मंडला आर्ट चे फायदे
आता कोरोना काळात मानसिक तणाव मानसिक तणाव मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे ; तसें तणावाचे प्रमाण आधीदेखील होतेच पण हल्ली अधिक दिसून आले.
हा मानसिक तणाव दूर करण्यासाठी किंवा आपण म्हणू शकतो तणावमुक्तीचे एक साधन या दृष्टीने मंडला आर्ट कडे पाहू शकतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि मंडला आर्ट कसे काय आपल्याला तणावमुक्त करेल..
जसे आपण आता पर्यंत वाचले कि मंडला आर्ट मध्ये बारीक प्रकारची सममिती असते; जिथे आपली एकाग्रता जरुरी असते शिवाय आपले कृतिकौशल्य ही विकसित होते. (कृतिकौशल्य = मोटर स्किल)
ड्रेक्सेल युनिव्हर्सिटी झालेल्या संशोधनात असे आढळून आले कि जेव्हा आपण मंडला आर्ट रेखाटत असतो तेव्हा आपले संपूर्ण लक्ष बारीक नक्षीकाम करण्यात असते. त्यामुळे कॉर्टिसॉल नावाचे हॉर्मोन चा थर कमी होतो जेणेकरून तणाव मुक्त होण्यास मदत होते. याचसोबत चिंतारोग किंवा भीती वाटणे म्हणजे अतिचिंता किंवा अति भीती एखाद्या गोष्टीची असणे ज्याला आपण anxiety म्हणतो.. या गोष्टी दूर करण्यास मंडला आर्ट चा उपयोग होतो.
मानसिक तणाव, अतिचिंता यांचबरोबर झोप चांगली येणे, रक्तदाब नियंत्रण, रोगप्रतिकार शक्ती वाढविणे या सर्व गोष्टी देखील मंडला आर्ट शिकल्यावर होतात. आपली एकाग्रता वाढते.
मंडला आर्ट ही फक्त कलाच नव्हे तर आपल्याला तणावमुक्त करून आपली एकाग्रता वाढतेच, आणि आध्यात्मिक प्रभावदेखील आपल्या मनावर होतो जेणेकरून आपण सकारात्मक दृष्टिकोन वापरून आयुष्याकडे बघायला शिकतो.
अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्याला नक्षीकाम करणे जमत नसेल तर बाजारात विविध प्रकारची मंडला आर्ट ची पुस्तके उपलब्ध आहेत जिथे तुम्ही फक्त रंग देण्याचे काम करून शकता..
तुम्ही देखिल मंडला आर्ट शिकून तुमचे मानसिक स्थैर्य नक्कीच वाढवा.
डॉ प्राची जगताप बामणे