आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी, विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या धारावीला नवे रूप देण्यासाठी उद्योगपती गौतम अदानी सज्ज झाले आहेत. त्याच धारावी पुनर्विकास प्रकल्प साकारताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत तसेच प्रस्तावित प्रकल्पाच्या अनुषंगाने कोणत्या कल्पना आहेत, हे सांगण्यासाठी देशाचे आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. मंगळवारी सात वाजताच्या सुमारास कृष्णकुंज या निवासस्थानी गौतम अदानी आणि राज ठाकरे या उभयतांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
संतप्त प्रवाशांनी मोटरमनला ट्रेन केबिनमध्ये कोंडले, एसी लोकलचा प्रताप
धारावी पुनर्विकासासाठी लिलाव प्रक्रियेत सहभागी झालेल्या तीन कंपन्यांपैकी अदानी समूहाची ५,०६९ कोटी रुपयांची बोली सरस ठरली. त्यामुळे अदानी समूहाकडे धारावीचा कायापालट करण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. त्याच अनुषंगाने गेल्या काही दिवसांपासून गौतम अदानी महाराष्ट्रातील प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. याआधी ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आशिष शेलार यांची भेट घेतल्यानंतर गौतम अदानी यांनी मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.
कल्याण मधील धक्कादायक घटना, सात वर्षीय मुलाची निर्घृण हत्या
ठाकरे कुटुंबाने अतिशय आदरपूर्वक गौतम अदानी यांचं स्वागत केलं. स्वत: राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला, चिरंजीव अमित आणि सून मिताली यांनी गौतम अदानींचे आदरातिथ्य केले. चहापानानंतर अदानी यांनी धारावी पुनर्विकासाच्या अनुषंगाने राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. जवळपास तासभर उभयतांमध्ये चर्चा झाली. ठाकरे कुटुंबाने केलेल्या स्वागताबद्दल आणि आदरातिथ्याबद्दल आभार मानून गौतम अदानी यांनी राज ठाकरे यांचा निरोप घेतला.