आज (१७ जुलै) मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर म्हणजेच ठाणे-कल्याण , सीएसएमटी-चुनाभट्टी, वांद्रे हार्बर मार्ग आणि पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) चर्चगेट-मुंबई सेंट्रल स्टेशन या ठिकाणी तांत्रिक कामे केली जातील. या मार्गावर मेगाब्लॉक (Megablock) असून लोकल उशिराने धावणार आहेत. हार्बर मार्गावरील (Harbour line) फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून केवळ विशेष फेरी चालवण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण अप आणि डाऊन एक्स्प्रेस मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत ब्लॉक आहे. सीएसएमटीहून सकाळी ९.३० ते दुपारी २.४५ वाजेपर्यंत धावणाऱ्या डाऊन फास्ट, सेमी फास्ट लोकल ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान सकाळी १०.२८ ते दुपारी ३.२५ या वेळेत कल्याणहून सुटणाऱ्या अप जलद लोकल अप धीम्या मार्गावर थांबवण्यात ठेवण्यात येणार आहेत. सीएसएमटी-चुनाभट्टी, वांद्रे हार्बर डाऊन मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी, वांद्रे-सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल.
सीएसएमटीहून वाशी, बेलापूर, पनवेल, वांद्रे, गोरेगावकडे सुटणाऱ्या आणि पनवेल, बेलापूर, वाशी, गोरेगाव, वांद्रे येथून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या लोकलही रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक काळात पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. रविवारी पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान दोन्ही धीम्या मार्गांवर सकाळी १०.३५ ते ३.३५ वाजेपर्यंत ब्लॉक असल्याने या दोन स्थानकांदरम्यान लोकल जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहे.