डोंबिवली (शंकर जाधव) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अमृत महोत्सवा निमित्त ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत देशातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरी तिरंगा लावल्याचे आवाहन करण्यात आले आहे. कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने ९ रुपयात तिरंग्याची विक्री सुरु केली आहे. पालिकेकडून खरेदी केलेल्या तिरंग्यात अनेक त्रुटी असून ध्वजाचा आकार नियमानुसार नाही, अशोकचक्र झेंड्याच्या कोपऱ्यात आहे तर काही ध्वजावर अशोक चक्राचा आकार वर्तुळाकार नसल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने पत्रकारांशी बोलताना केली.
मनसे उपशहरप्रमुख प्रेम पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डोंबिवली विधानसभा क्षेत्र संघटक संजय पाटील यांनी शासनाकडून प्राप्त झालेल्या तिरंग्यात अनेक त्रुटी असून प्रशासनाला याचे भान नव्हते का असा प्रश्न उपस्थित केला आहे. तिरंग्यात अनेक त्रुटी असल्याचे लक्षात येताच पालिका उपायुक्तानी प्रभाग क्षेत्र अधिकार्यांना दोषपूर्ण ध्वज बाजूला काढत चांगल्या ध्वजाची विक्री करण्याच्या सूचना दिल्या. मात्र तोपर्यत प्रत्येक प्रभागातून नागरिकांनी असे दोषपूर्ण झेंडे खरेदी केले आहेत. दरम्यान पालिकेला आतापर्यत शासनाकडून २ लाख ध्वज प्राप्त झाले असून आणखी १ लाख ध्वज प्राप्त होणार असून रेशन दुकानात तसेच बीएलओमार्फत घरोघरी राष्ट्रध्वजाचे वितरण केले जाणार आहे.