गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने धक्कादायक घडामोडी घडत आहेत. अजित पवार भाजपसोबत जाणार ही चर्चा सुरु झाल्यामुळे, राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. हे सुरू असतानाच नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे.
नाशिक शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. काही वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी आपला राजीनामा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राजीनामा दिल्याने पक्षात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, पदाला न्याय देऊ शकत नसल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दिलीप दातीर शिवसेनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आले. त्यानंतर त्यांची थेट महापौरपदी नियुक्ती झाली. मात्र आज त्यांनी अचानक शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. नाशिक हा मनसेसाठी महत्त्वाचा जिल्हा मानला जातो. मात्र त्याच नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का बसला आहे.