31 C
Mumbai
Friday, May 5, 2023
Homeब्लॉगआधुनिकता आणि जीवनाचा बाजार

आधुनिकता आणि जीवनाचा बाजार

मानवाच्या स्वतंत्र बुद्धीने विविध तत्वे साध्य करता यावीत या हेतूने भौतिक योजना बनविल्या. परंतु त्याच बुद्धीने मूळ तत्वांशी छेडछाड करून स्वतःचे समाधान करून घेतले. जागतिकीकरणाचा स्वीकार झाल्याने अर्थकरणाच्या हव्यासापोटी त्याचे दोषही ओढवून घेतले गेले. त्यामुळे जागतिकीकरणाने मानवाच्या आयुर्मानावर ताबा मिळवला आहे. म्हणूनच अर्थकरणाच्या चढाओढीत आरोग्याचा सर्वनाश अटळ आहे.

शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं यावर जास्त विचार केला जातो. यातूनच मूळ तत्वांची रचना बिघडवली जाते. अंतर्मनाला विचारून पाहा, अस जाणवेल आत्मवृद्धी हवी असेल तर मूळ आदानांपासून तृप्ती झाली पाहिजे. परंतु आधुनिकतेच्या बाजारात आपण अंतर्मनाला पॉलिश आणि दिखावा करण्याकडे वळवले आहे. म्हणूनच आवश्यक पोषकतत्वांची कमतरता पडत असल्याने आयुष्यवेल खुंटली आहे, कालांतराने ती अधिक रोडावत जातेय एवढे नक्की. मानवाच्या अंतर्मनाला तर पाश्चात्य संस्कृती आणि दिखावा करण्याचा कल याची जणू कीड लागली आहे. या कीडीचा जोपर्यंत नाश होणार नाही तोपर्यंत अंतर्मन साफ होणे कठीण आहे, तथापि याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यवेलीवर पाहायला मिळतोय. जागतिकीकरणामध्ये आयुर्मान कमी झाले आहे. परंतु आहे ते जीवन नित्याने जगण्यासाठी त्याला सुडौल बनवण्यासाठी ‘योग‘ आत्मसात करण्यावर भर देण्यात येत आहे. पूर्वी आरोग्यवेल सांभाळण्यासाठी कोणत्याच भौतिक गोष्टींची आवश्यकता नव्हती. योग शिष्टाचारातून जीवन व्यथित होत होते.

श्रीमद्भागवगीतामध्ये योग करा असे सांगितले आहे आणि आताची आरोग्य चिकित्सा तेच सांगते. ‘योग’ शारिरिक, मानसिक तसेच भावनिक रोगांपासून मुक्ती देतो. मानवाचे अस्तित्वच योग साधनेत आहे. म्हणूनच पूर्वीकाळच्या गमावलेल्या गोष्टी आता प्रत्येक क्षेत्रात डोके वर काढत आपले महत्व सांगू लागल्या आहेत, अशा विस्मृत तत्वांची आता गरजच बनली आहे.

आर्थिक विकास आणि अतिव्यस्त आधुनिक जीवनशैली यामुळे आपण तणाव, आराजकता, आजार, निद्रानाश, निराशा, विफलता, क्रोध, मोह, लोभ, अहंकार यातून जीवन निर्वाह करण्यास कटिबद्ध झालो आहोत. आधुनिक जीवनशैलीचा मानवाच्या प्रकृतीवर मोठा प्रभाव पडत आहे. कोणत्याही गोष्टीचे टाईमटेबल राहिलेले नाही. झोपणे, उठणे यात विसंगती आल्यामुळे आजारपण वाढले. त्यामुळे वेळापत्रकानुसार दिनचर्या करण्यासाठी मानवाला या आधुनिक जीवनात सल्लागारांचे (डॉक्टर) धडे अधिक प्रमाणात गिरवावे लागत आहेत. खाण्यापिण्याची वेळ नसल्याने मधुमेह सारखा आजार अधिक आहे. बालवयातच हृदयविकाराचा झटका, दृष्टीदोष, वगैरे समस्या मोठ्या प्रमाणात दिसतात.

आयुर्मान सुधारण्यासाठी आरोग्य सुविधा वारेमाप वाढल्या परंतु त्या सुविधा घेण्यासाठी आपले शरीर तर साथ द्यायला हवे ना? आपले शरीरच फास्टफूडच्या विळख्यात आहे. त्यामुळे आहार, व्यायाम, योगा, खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. वर्तमानात आरोग्यविषयक सल्ले घेताना असे जाणवेल की ते ऋषिमुनींनी सांगितलेल्या कार्यपद्धतींशी तंतोतंत जुळतात. माध्यम जरी वेगळी असली तरी पद्धती मात्र तीच आहे. त्यातून मिळणारे लाभदेखील समांतर आहेत. उदा. सूर्योदयापूर्वी उठणे, सात्विक जेवण, शारीरिक श्रम वगैरे…

आधुनिक जीवनशैली आत्मसात करताना मानवाने आराम करण्यासाठी अनेक प्रकारे विकास केला. परंतु हा ‘आराम’च आता डोकेदुखी बनला आहेे. याच आरामाचा थेट विपरित परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ लागल्याने पुन्हा शरिराला कष्टाच्या मागे धावावे लागत आहे. मग ते व्यायाम, स्वीमींग, खेळ, योगा या माध्यमातून असो. शारिरिक सुखसमृद्धी, आरामाच्या हव्यासापोटी मशीनीकरण आले. परंतु आता सुखसमृद्धी उपभोगायची म्हणून त्याच शरीरावर मशिनचा आघात (व्यायामासाठी वापरली जाणारी साधने) घ्यावा लागत आहे.

शहरी जीवनशैली पूर्णपणे विस्कळीत आहे. ती आजच्या युवा पिढीला कमजोर आणि आळशी बनवत चालल्याने बुध्यांकाची वाढ कमी होत आहे. पाश्चात्य संस्कृतीच्या मागे दिखावा करण्यात आपले आजचे युवक जीवन व्यथित करत आहेत. शहरी जीवनात असे कित्येकजण आहेत की ज्यांनी उगवता सूर्य कधी पाहिलाच नसेल. कारण दैनंदिन कामात तो एवढा व्यस्त आहे की त्याला स्वतःसाठी वेळ देता येत नाही. म्हणूनच याचा थेट परिणाम आरोग्यावर होताना दिसतो. उदाहरण द्यायचे झाले तर, सैन्य भरतीत युवकांना घाम गाळून, व्यायाम करून परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात. पूर्वीकाळी ही क्रिया सरळ घडत होती व आपल्या मजबूत शरीरयष्टीचे दर्शन घडवत युवक सहज सैन्यसेवेत रूजू व्हायचे. आता तर हृदयविकाराच्या झटक्याच्या संभाव्य धोक्यामुळे धावण्याचे अंतर देखील कमी करावे लागले. एवढी आपली जीवनपद्धती बिघडली आहे आणि त्याचा थेट परिणाम दिसत आहे.

धावपळीच्या जीवनात युवा वर्ग समोसा, कचोरी अशा फास्टफूडवर गुजराण करतो. काही अंशी फास्टफूड ही त्यांच्यासाठी फॅशन झाली आहे. ज्यावेळी फळे खायला हवीत त्यावेळी अशाप्रकारे आजारांना निमंत्रण दिले जाते. जो वेळ व्यायामासाठी द्यायला हवा तेथे आजचा युवा सोशल मीडियावर मश्गुल आहे. प्राणायाम, ध्यान, धारणा, आसन, विपश्यना, खेळ याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. त्यामुळे संगणक युगात वावरणारी युवा पिढी, नव्या पिढीची दृष्टी, नवे विचार, त्यामुळे बदलणारी वेगवान जीवनशैली याचा विचार करता विज्ञानाने प्रदान केलेल्या सुखसोयींनी मनुष्य समृद्ध झाला आहे, असे फक्त भासते, परंतु ‘प्रदूषित शरीर’ ही मानवनिर्मीत विज्ञानाच्या दुरुपयोगाची निर्मिती आहे.
मानवाच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी वीमा कंपन्यांची चढाओढ पाहायला मिळते. मानवाने आपले शरीर पूर्णपणे अशा कंपन्यांच्या स्वाधीन केले आहे, ज्यामुळे त्यांच्या भविष्यकालीन योजना पूर्ण होऊ शकतील.

भविष्यकालीन तरतूद म्हणजेच जीवनवीमा हे समीकरण आहे. जीवनवेल एवढी कमकूवत बनली आहे की, त्यावरील उपचार साधनांचा जणू बाजारच मांडला गेला आहे. प्रत्येक पावलावर जीवनाचा असा बाजार अनुभवायला मिळेल. सकाळी उठल्यापासून ते सायंकाळी निद्रा घेईपर्यंत मानवाला आता अशा बाजारातूनच जावे लागते.
प्रातःकाळी उठायला मोबाईल अलार्मशिवाय जाग येणे कठिण, चहा, नाश्तामध्ये तर फास्टफूड जिन्नस, जेव्हा कोवळी सूर्यकिरणे अंगावर पडावी तेथे कृत्रित बाथटब आला, पहाटे आसने करावी, वाचन करावे तर आज मोबाईलवर टाइम घालवायची सवय, अशातून आलेल्या स्थूलपणाला थोडा कुठे व्यायाम द्यावा तर व्यायामशाळेचे धडे गिरवल्याशिवाय पर्याय नाही. मग ऑफिसची वेळ टळते की काय याची चिंता, सहकार्‍यांसोबत मग फास्टफूडची फॅशन, सायंकाळी आराम दूरच, लवकर झोप मिळणे कठिण मग पुन्हा एखादा झोपेचा पर्याय (टॅब्लेट) अंगवळणी आणि यातूनच सुरू झाला आहे आरोग्याचा बाजार. जीवनशैली ठीक ठेवावी तर पदोपदी शरीरासाठी तुम्हाला या बाजारातूनच वाट काढावी लागते.

मानवी शरीर आधुनिकीकरणात पूर्णपणे पोखरून गेले असल्यानेच आता त्याला सुडौल करण्यासाठी भौतिक पर्यायांच्या मागे धावावे लागत आहे आणि त्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. धावपळीच्या जीवनात कोणतेही शारिरिक नियोजन राहिले नसल्याने आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम पाहायला मिळतोे. आपली आरोग्यवेल सुधारवायाची असल्यास दैनंदिनी सुधारणे काळाची गरज आहे. पूर्वीकाळी ऋषिमुनींनी सांगितलेले नियम व उपदेशांचे पालन करावयाचे झाल्यास निसर्गताच मिळणे कठिण आज आपल्याला बाजाराशिवाय पर्याय उरला नाही आणि यातूनच आपल्या जीवनवेलीला खतपाणी घालावयास हवे. त्यामुळे भौतिक गरजांच्या हव्यासासाठी आधुनिकीकरणात कितीही वावरलो तरी या बाजारातून आपल्याला कसे अधिक प्रमाणात अलिप्त राहता येईल, याची काळजी घेणे महत्वाचे आहे.

सूर्यकांत आयरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »