मागील २ वर्षांपासून कोरोना (Corona) महामारीने जगाला विळखा घातला होता. या जागतिक महामारीमुळे असंख्य लोकांचे प्राण गेले. आता कुठे परिस्थिती पूर्ववत होत आहे असे वाटू लागले आणि एका नवीन आजाराने दार ठोठावले आहे. तो म्हणजे मंकीपॉक्स (Monkeypox). मंकीपॉक्स हा आजार जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून जाहीर केला आहे. भारतात या रोगाने शिरकाव केला असून केरळ (Kerala) आणि दिल्ली (Delhi) येथे या आजाराचे ४ रुग्ण सापडले असून अद्याप महाराष्ट्रात (Maharashtra) एकही रुग्ण (Patient) सापडलेला नाही.
या पार्श्वभूमीवर मंकीपॉक्सचा धोका लक्षात घेऊन आधीच खबरदारी घेणे आवश्यक असून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाची बैठक घेत परदेशातून नवी मुंबईत आलेल्या नागरिकांची माहिती घ्यावी व त्यांची आरोग्य स्थिती जाणून घ्यावी असे निर्देश जारी केले आहेत. त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या २३ नागरी आरोग्य केंद्रांमार्फत त्यांच्या कार्याक्षेत्रातील परदेशातून आलेल्या नागरिकांच्या घरी भेट दिली जाणार आहे आणि त्यांची माहिती घेतली जाणार आहे. मंकीपॉक्सच्या लक्षणांबाबत नागरिकांना माहिती असावी यादृष्टीने व्यापक जनजागृती करण्याच्या सूचनाही आयुक्तांमार्फत देण्यात आल्या. कारण पावसाळ्यात होणाऱ्या आजारांची लक्षणे बऱ्याच अंशी सारखीच असतात.
ऑर्थोपॉक्स व्हायरस या विषाणूमुळे मंकीपॉक्स आजार होतो. अंगभरून ताप येणे, डोके दुखी, अंगदुखी, प्रचंड थकवा जाणवणे, घाम येणे, अंगावर पुरळ येणे, कानामागे अथवा काखेत लसीका ग्रंथींना सूज येणे अशी लक्षणे मंकीपॉक्सच्या आजारात जाणवत असून लागण झाल्यानंतर साधारणत: ६ ते १३ दिवस इतका मंकीपॉक्स आजाराचा कालावधी आहे. अंगावर पुरळ उठण्यापूर्वी १ ते २ दिवस आधीपासून ते त्वचेवर येणा-या फोडांवरील खपल्या पडेपर्यंत किंवा त्या पूर्णपणे ब-या होईपर्यंत मंकीपॉक्सचा संसर्ग कालावधी आहे.
मंकीपॉक्स आजाराचा प्रसार, या आजाराने ग्रस्त व्यक्तीशी शरीर द्रव, लैंगिक संपर्क, जखम व घाव यातील स्त्राव याव्दारे थेट शारीरिक संपर्क आल्यास किंवा बाधीत व्यक्तींनी वापरलेले कपडे वापरल्यास, बाधीत व्यक्तीच्या जास्त काळ संपर्कात आल्यास अथवा त्या व्यक्तीच्या श्वसन मार्गातून बाहेर पडणा-या मोठ्या थेंबांवाटे होऊ शकतो. त्यामुळे या आजाराबाबत गंभीर राहून वरील लक्षणे जाणवल्यास आवश्यक वैद्यकीय चाचण्या करून घेणे महत्वाचे आहे.
या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सतर्कतेने जलद पावले उचलावीत व मंकीपॉक्सबाबत नागरिकांना माहिती होण्यासाठी त्याची लक्षणे तसेच तो होऊ नये म्हणून घ्यावयाची खबरदारी या अनुषंगाने जनजागृतीवर भर द्यावा त्याचप्रमाणे नागरिकांसारखेच खाजगी डॉक्टरांनाही याविषयी माहिती करून द्यावी असे निर्देश आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागास दिले.