आज दिवसभरात अनेक शिवसैनिक (Shivsena) रस्त्यावर उतरताना दिसले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांविरुद्ध शिवसैनिकांनी मोर्चे काढले होते. त्यांच्या कार्यालयांची तोडफोड केली तसेच अनेक ठिकाणची बॅनर फाडली. त्यातच एकनाथ शिंदे व आमदार राज्यात परतल्यावर राजकारणात अजून काय गोंधळ होणार यावर आता सर्वांची नजर आहे.
आमदार परतल्यावर आज झालेल्या गोंधळाचा प्रकार वाढू शकतो याची शक्यता काही नाकारली जात नाही. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी एक निर्णय घेतला आहे. मुंबई शहरात कोणत्याही प्रकारचे संघर्ष मोठ्या प्रमाणात होऊ नये व सर्व सुरळीत शांततेत पार पडावे यासाठी आजपासून १०जुलै पर्यंत मुंबई शहरात जमावबंदी लागू केली आहे.
नुकतीच यासंदर्भात मुंबई पोलीस आयुक्त व उपआयुक्त यांची बैठक झाली. मुंबईमधील सर्व पक्षांचे मंत्री,खासदार,आमदार,नगरसेवक यांच्या कार्यालय व निवासस्थानी कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी कोणत्याही प्रकारचे चुकीचे वर्तन, आक्षेपार्ह बॅनर लावू नये आणि कोणत्याही पक्षाने कायदा हातात घेऊ नये , तोडफोड, हिंसा करू नये अश्या सक्त सूचना दिल्या आहे.