राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. मुसळधार पावसाने बऱ्याच ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच बऱ्याच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. त्यातच आता हवामान खात्याने रायगड, पालघर या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट (Red Alert) जारी केल्याने तेथील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शाळानंतर मुंबई विद्यापीठानेही मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) आज (१४ जुलै) होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. मुसळधार पावसाचा परिणाम लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांच्या म्हणण्यानुसार, ”१४ जुलै रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द केल्या असून परीक्षेच्या नवीन तारखा लवकरच जाहीर होतील.” आज मुख्यतः इंजिनीअरिंग शाखेच्या परीक्षा होत्या. तसेच इतर विद्याशाखेच्या परीक्षा ही रद्द झाल्या आहेत.
हवामान खात्याने रत्नागिरी,सिंधुदुर्ग,पालघर,रायगडमध्ये रेड अलर्ट दिला आहे, तर मुंबईत ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे रायगड व पालघर येथील शाळांना सुट्टी दिली आहे. मुंबई मधील काही शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे.
फक्त मुंबईच नाही तर पुण्यातही हवामान खात्याने १४ व १५ जुलैला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यामधील इंदापूर, दौंड,बारामती, शिरूर आणि पुरंदर हे तालुके वगळता इतर सर्व तालुक्यात १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना १४ जुलै ते १६ जुलै पर्यंत सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.