
मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत असताना राज्यात अचनाक रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. ही वाढ होण्यामागे कोरोनाचा नवा व्हेरिएंट असण्याची तसेच कोरोना लसीकरणामुळे शरीरात निर्माण झालेल्या अँटीबॉडीज स्तर खालावल्यामुळे असण्याची शक्यता आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.
कोरोनाच्या उद्रेकानंतर आतापर्यंत त्याचे अनेक व्हेरिएंट आले आहेत. प्रत्येक व्हेरिएंटच्यावेळी रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून आली आहे. त्यामुळे सध्या होत असलेल्या करोना रुग्णांच्या वाढीमागे नवा व्हेरिएंट असण्याची शक्यता आहेत. तसेच राज्यात सर्व नागरिकांनी कोरोनाविरोधी लस घेतल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात यश आले. मात्र लस घेऊन आता साधारणपणे एक ते दीड वर्षे उलटला आहे. त्यामुळे लसीकरणामुळे शरीरात निर्माण झालेल्या अँटीबॉडीज स्तर हळूहळू खालावत जाऊन ती सुप्तावस्थेत गेली आहेत. कोणताही आजार आल्यास त्यांच्याशी लढा देणाऱ्या पेशींच्या स्मृतीमध्ये असलेल्या अँटीबॉडीज पुन्हा ॲक्टिव्ह होतात. त्याप्रमाणे सध्या सुप्तावस्थेत असलेली कोरोनाच्या अँटीबॉडीज ही पुन्हा सज्ज होतील. मात्र नवा व्हेरिएंट असल्याने त्याला ॲक्टिव्ह होण्यास थोडासा वेळ लागण्याची शक्यता आहे.
कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी बनविण्यात आलेल्या लसीसाठी ज्या पेशींमधील घटकांचा वापर केला होता. त्यातुलनेत नव्या व्हेरिएंटमध्ये बदल झालेला असल्याने ही अँटीबॉडीज पुन्हा सतर्क होण्यास थोडासा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र नागरिकांच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीजमुळे करोनाने यापुढे मृत्यू होण्याचे प्रमाण फारच अल्प असणार असल्याची माहिती इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिनचे मुंबई शाखेचे सचिव डॉ. भरत जगियासी यांनी सांगितले.
सध्या वाढत असलेल्या करोनाच्या प्रादुर्भावाला घाबरण्याची आवश्यकता नसून योग्य काळजी घेण्याची गरज आहे. ज्या नागरिकांना दीर्घ आजार आहेत, ज्येष्ठ नागरिक, फुफ्फुस व श्वसनाचे आजार असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
– डॉ. भरत जगियासी, सचिव, इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन, मुंबई शाखा
काय काळजी घ्यालमास्क वापरा
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
हात साबणाने स्वच्छ धुवा
भरपूर पाणी प्या
शिंकताना व खोकताना तोंडावर व नाकावर रुमाल धरा
डॉक्टरांचा सल्ला घ्या