डोंबिवली ( शंकर जाधव )
दिवाळीपूर्वी कल्याण डोंबिवली परिसरातील रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी त्याचप्रमाणे सर्व परिसर स्वच्छ ठेवण्याकरीता २४ तास ऑनफिल्ड काम करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी यापूर्वीच सर्व संबधित अधिकारी वर्गाला दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री अचानक आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी कल्याण पूर्व परिसरातील पुनालिंक रोड, 9० फुटी रस्ता, त्याचप्रमाणे डोंबिवलीतील चोळे गांव, ठाकुर्ली, डोंबिवली स्थानक परिसर, कल्याण पश्चिम येथील सहजानंद परिसर येथे पाहणी दौरा केला.
पालिका आयुक्तांनी परिसरातील अस्वच्छता पाहून संबंधित प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांना फैलावर घेत सर्वत्र स्वच्छता राखणेबाबत तसेच वेळच्या वेळी कचरा उचलून घेण्याबाबत सज्जड ताकीद दिली. पाहणी दौऱ्या दरम्यान आयुक्त डॉ.दांगडे यांनी कल्याण पूर्वेतील वालधुनी परिसर, डोंबिवलीतील नेहरू रोड येथील खड्डे भरण्याच्या कामाची पाहणी केली आणि उपस्थित अधिकाऱ्यांना त्याबाबतच्या सूचना दिल्या.दिवाळी पूर्वी महापालिका क्षेत्रातील खड्डे बुजवण्याचे काम करण्याबाबत आम्ही प्रयत्नशील असून, कल्याण डोंबिवली नगरी स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी कचरा वेळेत उचलून घेण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी, हॉटेलधारकांनी, दुकानदारांनी देखील आपला कचरा रस्त्यावर वा इतरत्र न टाकता महापालिकेच्या घंटागाडीत देऊन शहराचे विद्रुपीकरण टाळण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे, असेही आवाहन डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी या पहाणी दौ-या दरम्यान केले.
कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ 150 मी. परिसरात फेरीवाले बसणार नाहीत, याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. जर या ठिकाणी फेरीवाले आढळून आल्यास संबंधित प्रभागक्षेत्र अधिकारी/पथक प्रमुख यांच्यावर कारवाई केली जाईल , असा इशारा डॉ.दांगडे यांनी दिला. झोपडपट्टी परिसरात प्रामुख्याने महापालिकेच्या घंटागाड्या पोहोचत नाहीत, अशा ठिकाणचे लोक बाहेर कचरा टाकत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हा कचरा रात्रीच उचलून घेण्याची व्यवस्था महापालिकेकडून करण्यात येत आहे, जेणेकरून सदर कचरा सकाळी पुढील प्रक्रियेसाठी पाठविला जाईल अशी हि माहिती त्यांनी यावेळी दिली.यावेळी शहर अभियंता अर्जुन अहिरे, महापालिका सचिव तथा विभाग प्रमुख (माहिती व जनसंपर्क) संजय जाधव, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, उपमुख्य स्वच्छता अधिकारी घुटे, कार्यकारी अभियंता जगदिश कोरे, सहा.आयुक्त दिनेश वाघचौरे व अन्य अधिकारी उपस्थित होते.