डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ डोंबिवली यांचे संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ सर्वेक्षण २०२३ व माझी वसुंधरा अंतर्गत स्वच्छ्ता जनजागृती या अभियानाच्या माध्यमातून डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले क्लामंदिरात जनजागृतीपर कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना माहिती व पर्यावरण विषयक लघुफित दाखविण्यात आली. त्याचप्रमाणे उपस्थितांमार्फत स्वच्छता विषयी शपथ देखील घेण्यात आली.
यावेळी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त संजय साबळे, दिनेश वाघचौरे, उपमुख्य स्वच्छता अधिकारी घुटे, स्वच्छ्ता अधिकारी वसंत देगलूरकर व पर्यावरण मंडळाच्या रुपाली शाईवाले तसेच विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी पालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांडगे यांनी मुले- विद्यार्थी अनुकरणप्रिय असल्यामुळे चांगला बदल घडवून आणू शकत असल्याचे सांगितले. शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी जशी महापालिकेची आहे तशीच ती नागरिकांची देखील आहे आणि मुले ही देशाची भावी नागरिक आहेत. त्यामुळे स्वच्छतेचे महत्व त्यांच्यावर बिंबविल्यास या मुलांमार्फत पर्यायाने त्यांच्या पालकांमार्फत, शिक्षकांमार्फत म्हणजेच नागरिकांमार्फत नक्कीच चांगला बदल घडून येईल, असा विश्वासही महापालिका आयुक्त डॉ. दांगडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.