डोंबिवली ( शंकर जाधव ) :- कोरोना काळापासून प्रशासकीय राजवट असून पालिकेच्या रुग्णालयाकडे पाहण्यास पालिका आयुक्तांना वेळ कधी मिळणार ? असा प्रश्न उपस्थित करत या रुग्णालयाची आरोग्य सेवा बिघडली असून यावर लवकरात लवकर उपाय योजना करा आणि रुग्णालयाचे आरोग्य सुधारा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केली आहे.या रुग्णालयात अनेक समस्या असून त्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पुढाकार घेतल्याने रुग्ण व नातेवाईक त्यांचे आभार मानत आहेत.

राष्ट्रवादि काँग्रेस पार्टीचे डोंबिवली शहरअध्यक्ष सुरेश जोशी यांसह गोवर्धन भोईर, रमेश दिनकर, सुनील फळदेसाई,उदय शेट्टी, शशिकांत म्हात्रे, तुषार
मानकामे, मंगेश जाधव, अविनाश बेनके यांनी डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयाची पाहणी केली.राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने रुग्णालयाचे मुख्य वैद्यकिय अधिकारी दीपा शुक्ला यांची भेट घेऊन निवेदन दिले.शास्त्रीनगर रुग्णालयात आपत्कालीन सेवा जरी 24 तास सुरू असली तरी दुपार व सायंकाळी डॉक्टर्स रुग्णांना भेटत नाहीत अशी ओरड रुग्णांकडून सुरू झाली आहे.रुग्णालयातील सफाई कर्मचारी, आया, वाँडबॉय यांची बदली अनेक वर्षांपासून झाली नाही.नियमानुसार प्रशासनाने यांची ठराविक काळानंतर बदली करणे आवश्यक असते.मात्र तसे होत नसल्याने हे रुग्णालयात कर्मचारी, आया आणि वाँडबॉय याकरता वेळेवर येणे, रुग्णाकडे लक्ष देणे महत्वाचे मनात नाही अशी दबक्या आवाजात रुग्णालयात चर्चा सुरू झाली आहे.शास्त्रीनगर रुग्णलयात इंक्युपेटर ( लहान मुलांच्या उपचारासाठी आवश्यक ) पेटीबाबत स्थायी समिती सभेत चर्चा झाली होती.मात्र याबाबत लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांनी फारसे लक्ष दिले नाही.या रुग्णालयात बर्न वाँड नसल्याने जळालेल्या रुग्णांला खाजगी अथवा ऐरोली येथील रुग्णालयात पाठवावे लागते.प्रसूतीगृहात महिलांनी नाव नोंदवून ऐनवेळी अश्या महिलांना दुसऱ्या रुग्णालयात जाण्यास सांगितले जाते.अनेक दिवसांपासून मोतीबिंदू आणि काचबिंदूचे ऑपरेशन होत नाही.अनेक महिन्यापासून शस्त्रक्रिया होत नसल्याने रुग्णांना नाईलाजास्तव खाजगी रुग्णालयाची वाट धरावी लागते. या सर्व समस्येबाबत राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्य वैद्यकीय अधिकारी शुक्ला यांच्याशी चर्चा केली.या समस्येबाबत पालिका आयुक्तांशी चर्चा करू असे आश्वासन शुक्ला यांनी दिले.
चौकट
शास्त्रीनगर रुग्णालयात मोतीबिंदू व कांचबिंदू शस्त्रक्रिया होत नाही…
प्रसूतीगृहात ऐनवेळी गरोदर महिलांना दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला..
बर्नवाँड नसल्याने जळालेल्या रुग्णांला खाजगी अथवा ऐरोली येथील रुग्णालयात जाण्याचा सल्ला..
दुपारी व सायंकाळी डॉक्टर्स रुग्णसेवा देण्यास नसल्याची रुग्णांची ओरड…
सफाई कर्मचारी, आया आणि वाँडबॉय यांची अनेक महिन्यापासून बदली होत नसल्याची चर्चा…
रुग्णालयात पोलीस उपलब्ध असल्यास डॉक्टर्स आणि कर्मचारी सुरक्षितपणे काम काम करू शकतात..
कर्मचारीवर्ग गणवेश परिधान करणे बंधनकारक करणे..