महाड : महाड येथील जागतिक कीर्तीचे वैद्यकीय संशोधक डॉ. हिम्मतराव बावस्कर यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराबद्दल आज महाड उत्पादक संघटनेतर्फे डॉ. हिम्मतराव बावस्कर आणि डॉ. सौ.प्रमोदिनी बावस्कर यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. बावस्कर यांचे संशोधन मानवजातीला वरदान असल्याचे गौरवोद्गार श्री. संभाजी पठारे यांना यावेळेस काढले. तर संशोधनाला पैसा लागतो हा समज चुकीचा आहे, अशा भावना सत्काराला उत्तर देताना डॉ. बावस्कर यांनी व्यक्त केल्या.
औद्योगिक वसाहतीमधील सीईटीपी हॉलमध्ये एमएमएचे सीईटीपीचे अध्यक्ष श्री. संभाजी पठारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सत्कार सोहोळ्याला उपाध्यक्ष श्री. अशोक तलाठी, श्री.मधुकर ताम्हणकर उपस्थित होते.शाल, श्रीफळ, मानपत्र आणि स्मृतीचिन्ह देवून डॉ.बावस्कर दांपत्याचा यावेळेस गौरव करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना डॉ.बावस्कर यांनी ,जर पद्मश्री पुरस्कार मला आधी मिळाला असता तर कदाचित मी माझ्या ध्येयापासून विचलीत झालो असतो अशा भावना डॉ.बावस्कर यांना सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या. आपण संशोधन कार्यासाठी ट्रस्ट स्थापन करावा असा सल्ला आपल्याला अनेकांनी दिला. निरोगी आणि निरामय जीवनासाठी व्यायाम आवश्यक असल्याचा सल्ला त्यांनी दिला. या परिसराच्या प्रगतीला एमआयडीसी मुळे चालना मिळाल्याचे सांगितले.
श्री. संभाजी पठारे यांनी अध्यक्षिय मनोगत व्यक्त करताना, एका महान व्यक्तीमत्वाचा सत्कार करताना विशेष आनंद होत असल्याचे सांगितले. एमएमए कोविड सेंटरमध्ये डॉ. बावस्कर यांनी मोठे योगदान दिल्याचे आणि अत्यंत निरलस वृत्तीने त्यांनी रुग्णांवर उपचार केल्याचे श्री. पठारे म्हणाले.
प्रास्ताविक एमएमएचे उपाध्यक्ष अशोक तलाठी यांनी केले. डॉ.बावस्कर यांच्या रुपाने महाडला एक हिरा लाभला असल्याचे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. त्यांनी असेच उत्तुंग काम करावे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. डॉ. सौ. प्रमोदिनी बावस्कर यानीही यावेळेस आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुधीर शेठ यांनी केले, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एमएमए साई टीपीचे व्यवस्थापक जयदीप काळे, निखिल भोसले यांनी परिश्रम घेतले.