डोंबिवली (शंकर जाधव)
गर्दीचा फायदा आणि रेल्वे स्थानक येताच प्रवाशांचे पाकीट मारणाऱ्या पाकिटमारला डोंबिवली रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानकात अटक करून बेड्या ठोकल्या. चोरटा संशयास्पदरित्या रेल्वे स्थानकात फिरत असताना पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता तो घाबरला. त्याला पकडून पोलीस ठाण्यात नेल्यानंतर त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पाकीट सापडले. २६ तारखेला सायंकाळी साड़े तीन वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकातून मुंबईच्या दिशेने निघालेल्या धीम्यागतीच्या गाडीत एका प्रवाशाचे पाकीट अटक केलेल्या चोरट्याने मारले होते. पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्याची झडती घेतली असता त्याच्याकडे हे पाकीट सापडले होते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शोएब अब्दुल मुजीब शेख ( १९ ) असे अटक केलेल्या पाकिटमाराचे नाव असून तो मुंब्रा येथे राहतो. फिर्यादी सुनील परब हे कल्याण रेल्वे स्थानकातून गाडीत बसले असता शोएबची नजर त्यांच्या खिशातील पाकिटात होती. गाडी डोंबिवली रेल्वे स्थानकात आली असता शोएबने परब यांचे पाकीट मारून रेल्वे स्थानक येताच पळ काढला होता. परब यांनी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली असता चोरट्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या आदेशानुसार व सुचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक एम.के. पवार, पोलीस हवालदार सुनील पाटील आणि पोलीस अंमलदार पवन जाधव हे पाकिटमाराचा शोध घेत असताना शोएब हा रेल्वे स्थानकात फिरताना दिसला. पोलिसांना त्याचा संशय आल्याने त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी शोएबला पोलीस ठाण्यात आणून त्याची झडती घेतली.