वसई : परम पूजनीय वासुदेवानंद स्वामी सरस्वती महाराज अर्थात थोरले महाराज यांचे भव्य मंदिर वसईमध्ये उभारण्यात येत आहे. श्रीपाद वल्लभ सेवा संस्था यांच्या माध्यामातून उभारण्यात येणारे हे थोरले महाराजांचे हे संपूर्ण भारतातील एकमेव मंदिर आहे.
अखंड दत्तनामाची गंगा घरोघर पोहचविणारे साक्षात दत्तावतारी पतिचक्रवर्ती परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या चिंतू पाडा, लक्ष्मी कॉम्प्लेक्सजवळ पालघर पश्चिम येथे हे भव्यदिव्य मंदिर उभारण्यात येत आहे. लॉकडाऊनदरम्यान मंदिराचे काम बंद ठेवावे लागले होते, तथापि, यापुढे मंदिराचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. श्रीपाद वल्लभ सेवा संस्थेच्या अनेक उपक्रमांपैकी हा एक भव्य उपक्रम आहे. या भव्यदिव्य मंदिराचे भूमिपूजन गेल्या वर्षी वसईतील श्रीपाद वल्लभ सेवा संस्थेचे अध्यक्ष सौरभ भोळे यांच्या हस्ते संपन्न झाला. मंदिराची व्यापकता आणि आवश्यक ती शुद्धिर्भूत सेवा प्राप्त करताना अनेक अडचणी येत असल्या तरी स्वामी कृपेने लवकरच हे काम पूर्ण होईल, असा विश्वास अध्यक्ष भोळे यांनी व्यक्त केला आहे.
मंदिर उभारणीच्या संस्थेच्या कार्याला श्री क्षेत्र गरुडेश्वर येथील परम पूजनीय दंडी स्वामी निर्मलानंद तिर्थ, श्री क्षेत्र गरुडेश्वर येथील संस्थांचे विश्वस्त शेजवलकर, गवारीकर, श्री योगी चित्रपटाचे निर्माते उत्तम (माऊली) मयेकर पुरोहित, श्री दत्त महाराजांची राजधानी असलेले श्री क्षेत्र नरसोबावाडी येथील संजय पुजारी, थोरल्या स्वामींच्या जन्म स्थानाचे श्री क्षेत्र माणगांव येथील विभवजी पेंढारकर, श्री क्षेत्र गरुडेश्वर येथील दिगंबर नवरे आदी, श्री उपासक विद्वतजनांचे आशिर्वाद व शुभेच्छा प्राप्त झाल्या आहेत. मंदिराचे पावित्र्य आणि उपासना या अनुषंगाने मान्यवर अधिकारीजनांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल गतिमान होत असल्याचे भोळे यांनी सांगितले आहे. शिवाय संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम ही हाती घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले.