डोंबिवली (शंकर जाधव)
डोंबिवली पश्चिमेला स्टेशनबाहेर बिनदास्तपणे दारू पीत बसल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. समोरच्या वाईन शॉपमधून दारू घेऊन दारुडे स्टेशनबाहेरच बाटल्या ठेवून पित असताना दिसतात. हा बार रात्री आठ वाजण्यापासून सुरू असतो. अनेक दिवसांपासून दारुड्यांचा हा प्रकार सुरु असून विष्णूनगर पोलीस मात्र याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसते. मुंबईत कामासाठी गेलेले चाकरमानी रात्री डोंबिवलीत आपल्या घरी जात असताना हा प्रकार पाहून संतापले आहेत. या प्रकाराने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
डोंबिवली पूर्वेला स्टेशनबाहेर दिवसा रस्त्यावर दारू पित असल्याचा प्रकार अनेक वर्षापासून सुरू आहे.रामनगर पोलिसांनी याकडे लक्ष देणे बंद केले आहे.आता असाच प्रकार डोंबिवली पश्चिमेला स्टेशनबाहेर सुरू झाला आहे. स्टेशनबाहेरील वाईन शॉप मधून दारू घेऊन दारुडे समोरील कट्ट्यावर बसून दारू पित बसलेले असतात. रात्री आठ वाजल्यापासून दारुडे कट्टयावर जमा होतात.
मावस बहिणीनेच केली चोरी, २० लाख रुपये किमतीचे दागिने जप्त
समोरील वाईन शॉपचा चांगलाच धंदा होत असल्याने त्यानेही यावर हरकत घेतली नाही. स्टेशनबाहेरून घरी जात असताना महिला या रस्त्यावरून जाताना असुरक्षित असल्याचे बोलत आहेत. पूर्वी या कट्टयासमोर अनेक दुकाने होती. पालिका प्रशासनाकडून दुकाने तोडण्यात आली असून स्टेशनबाहेरील रस्ता वाहनांसाठी सुरक्षित व नागरिकांना फुटपाथवरून चालण्यास सोयीचे झाले आहे. मात्र आता या कट्टयाचा ताबा दारुड्यांनी घेतल्याने एखादी घटना घडल्यानंतर पोलीस जागे होणार का असा प्रश्न डोंबिवलीकरांंना पडला आहे.
वाईन शॉपला पोलिसांंकडून अद्याप नोटीस नाही
ज्याप्रमाणे डोंबिवली पूर्वेला स्टेशनबाहेर वाईन शॉपसमोर दारू पित असल्याच्या तक्रारी आल्यावर रामनगर पोलिसांनी वाईन शॉपला नोटीस बजावली होती. मात्र डोंबिवली स्टेशनबाहेर वाईन शॉपसमोर हा प्रकार सुरू असून विष्णूनगर पोलिसांनी येथिल वाईन शॉपला अद्याप नोटीस बजावली नाही.