मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती खुद्द राज ठाकरे यांनी ट्विटरवर दिली. राज यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पुण्यातील बैठकीत याबाबत सविस्तर बोलणार असल्याचे राज यांनी स्पष्ट केले आहे. पुण्याच्या दौऱ्यावरून राज ठाकरे अचानक मुंबईत परतले तेव्हापासून त्यांच्या अयोध्या दौऱ्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अखेर आज या चर्चांना पूर्णविराम देत राज यांनी दौरा पुढे ढकलल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध केला. उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि नंतर अयोध्येत यावे अशी ब्रिजभूषण सिंग यांची अट आहे. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव तुर्तास राज यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. 22 तारखेला पुण्यात होणाऱ्या बैठकीत राज ठाकरे या विषयावर भाष्य करतील, असे संकेत राज यांनी ट्विटरवर टाकलेल्या पोस्टमध्ये (Post) दिले आहेत.
ट्विटरवरील (Twitter) पोस्टमध्ये राज यांनी लिहिले की, ‘तुर्तास अयोध्या दौरा पुढे ढकलला’. पुढे ‘महाराष्ट्राच्या सैनिकांनो, चला! रविवारी 22 मे रोजी सकाळी 10 वाजता गणेश कला क्रीडा केंद्र, पुणे येथे याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे.
काही दिवसांपूर्वी राज अचानक पुणे सोडून मुंबईत परतले. या दौऱ्यावरून राज परत येण्यामागे पायाला दुखापत झाल्यामुळे परत आल्याचे सांगितले जात आहे. दीड वर्षापूर्वी राज यांच्या पायाला दुखापत झाली होती. दुखापतीमुळे त्याच्यावर अधूनमधून उपचार करण्यात आले. मात्र आता पुन्हा अडचण सुरू झाली आहे.
पुण्यातील बैठकीनंतर राज पुन्हा डॉक्टरांचा (Doctor) सल्ला घेणार आहेत. पुढील तारीख आणि दौऱ्याबाबतचे धोरण सल्ल्यानुसार ठरवले जाईल. डॉक्टरांकडून असेही म्हटले जात आहे की, पायाच्या समस्येवर उपचार करण्यासाठी राज यांच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागेल, असा प्राथमिक अंदाज आहे.