डोंबिवली (शंकर जाधव)
ज्ञान प्रबोधिनीच्या निगडी क्रिडाकुलाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ज्ञान प्रबोधिनी विस्तार केंद्र डोंबिवलीतर्फे रविवार १६ एप्रिल रोजी सायंकाळी टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या एमआयडीसी येथील लोकमान्य गुरुकुल शाळेच्या पटांगणावर निगडी क्रिडाकुलाच्या विद्यार्थ्यांच्या भव्य क्रिडा प्रात्यक्षिकांचे आयोजन सर्वांसाठी विनामूल्य आयोजित केले आहे. क्रिडा प्रात्यक्षिकांमध्ये विद्यार्थ्यी मल्लखांब, जिमनॅस्टिक विविध योगासने, रिंग ऑफ फायर या सारखी अनेक प्रात्यक्षिके सादर करणार आहेत.
ज्ञान प्रबोधिनी निगडी क्रिडाकुल हा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रीय पद्धतीने खेळाडू घडविणारा प्रकल्प म्हणून ओळखला जातो. या क्रिडाकुलातील खेळाडूंनी विविध खेळांमध्ये जी कौशल्ये आत्मसात केली आहेत, त्या कौशल्यांचे सादरीकरण भव्य दिव्य अशा प्रात्यक्षिकांद्वारे होणार आहे. या निमित्ताने वैविध्यपूर्ण भारतीय खेळ व व्यायाम प्रकारांची माहिती जनसमुदायाला होणार आहे तसेच निगडी क्रीडाकुलाची खेळाडू घडविणारी प्रक्रिया अधिक चांगल्या पद्धतीने डोंबिवलीकरांना समजून घेता येणार आहे.
अनेक स्तरावर नैपुण्य मिळवलेल्या या छोट्या निर्भिड शिलेदारांनी आत्मसात केलेल्या कौशल्यांचे मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण पहाण्यासाठी डोंबिवलीतील समस्त पालकांनी आपल्या मुलांसह उपस्थित रहाण्याचे आवाहन ज्ञान प्रबोधिनी विस्तार केंद्र डोंबिवलीच्या ज्योती कर्वे यांनी केले आहे