डोंबिवली ( शंकर जाधव )
रेल्वेच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू असताना बाजूला असणारी जुनी भीत अंगावर कोसळून दोन कामगार मृत तर तीन जण गंभीर जखमी झाले.ही घटना बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कोपर रोडवरील सीमा डेकोरेटरजवळ घडली. या घटनेतील मृत कुटुंबियांना रेल्वे प्रशासनाने मदत जाहीर करावी अशी मागणी ज्येष्ठ माजी नगरसेवक राजेश मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
डोंबिवली पश्चिम सिद्धार्थ नगर परिसरात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मल्लेश चव्हाण (35), आणि बंडू कोवासे (50) य दोघांचा मृत्यू झाला असून माणिक ओवर (62) ,विनायक चौधरी (35) , युवराज वेडगुत्तलवार (35) अशी जखमींची नावे आहेत. हे सर्व कामगार मुलाचे आंध्र येथे राहणारे असून सध्या ते दिवा आणि मुंब्रा परिसरात राहत आहेत.
घटना घडल्यानंतर सिद्धार्थ नगर गोंधळी समाज जोशी मित्रमंडळ वस्तीतील तरुण मदतीला धावून आले. किशोर भिसे, दत्ता म्हात्रे, श्रावण माने, लेखन पैठणे, रोहित इंगळे, सतीश जोशी हे देवीचे मंडप बांधण्याच्या तयारीत व्यस्त असतानाच अचानक ओरडण्याचा आवाज आल्याने हे सर्व मंडळी पुढे धावून गेले. यावेळी या सर्व तरुणांनी धावपळ करत या सर्व कामगारांना ढिगाऱ्यातू बाहेर काढण्यासाठी मदतीचा केली.
सिद्धार्थ नगर वस्तीतील नागरिकांची घरे पाडली तेव्हाच ही जुनी भिंत पण पाडा असे वस्तीतील नागरिकांनी प्रशासनाला सांगितले होते. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे वस्तीतील महिलांनी सांगितले. वृषभ ठक्कर यांनी काम सुरू असताना अचानक भिंत कोसळली त्यामुळे आम्हाला देखील समजलेच नाही असे सांगितले.माजी नगरसेवक मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली असता मजुरांना पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केल्याचे समजले. मोरे यांनी मृत मजुरांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.अतिशय दुर्देवी घटना घडली असून रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
भाजप कल्याण जिल्हाअध्यक्ष शशिकांत कांबळे यांसह माजी नगरसेवक मुकुंद पेंढणेकर, पवन पाटील, सचिन चिटणीस यांनी रुग्णालयात मृत मजुरांच्या कुटुंबियांची भेट घेतली.याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांना सदर घटनेची माहिती देऊन कुटुंबियांना मदत मिळावी अशी मागणी करणार असल्याचे सांगितले.
सदर ठिकाणी मजुरांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी संबंधित सुपरवायझर व ठेकेदारांवर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती डोंबिवली सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी सांगितले.