पुणे महापालिका जिंकण्यासाठी मनसे जोरदार प्रयत्न करत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray)चार महिन्यांपूर्वी पुण्यात आले होते. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राज यांनी पक्षांतर्गतही बदल केले होते. पुणे महापालिका जिंकण्यासाठी आता राज ठाकरेंनी नवा नारा दिला आहे. लढायचं ते जिंकण्यासाठीच असा नाराच मनसेने दिला आहे. 9 मार्चला मनसेचा 16 वा वर्धापन दिन आहे, त्या पार्श्वभूमीवर राज यांची पुण्यात सभा होणार आहे. या सभेतून लढायचं ते जिंकण्यासाठीच असे आवाहन दिले जाणार आहे. विशेष म्हणजे मनसेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम प्रथमच मुंबईबाहेर होत आहे. त्यामुळे या रॅलीकडे सर्वांचे लक्ष लागले असून राज ठाकरे कोणाला टार्गेट करणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे 7 ते 10 मार्च दरम्यान पुणे दौऱ्यावर आहेत. 9 मार्च हा मनसेचा वर्धापन दिन असल्याने पुण्यातच हा कार्यक्रम होणार आहे. पुण्यातील स्वारगेट येथील नेहरू स्टेडियमजवळील गणेश कला क्रीडा केंद्रात वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मनसेने पोस्टर तयार केले आहेत. लढायचं ते जिंकण्यासाठीच या पोस्टर्सवर नवीन घोषणा छापण्यात आल्या आहेत. त्यामुळे मनसेच्या नव्या घोषणेला पुण्यातील तसेच महाराष्ट्रातील जनता कशी दाद देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोस्टरवर अमित ठाकरे
दरम्यान, मनसेच्या इतिहासात पहिल्यांदाच अमित ठाकरेंसोबत राज ठाकरेंचा फोटो जाहिरातीवर दिसला आहे. अमित ठाकरे मनसेमध्ये अधिक सक्रिय झाले आहेत. त्यांच्याकडे नाशिकची जबाबदारीही देण्यात आली आहे. तसेच मराठी भाषा दिनानिमित्त मनसे विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी अमित ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसेची नवी जबाबदारी मिळाल्यानंतर अमितचे छायाचित्र कोणत्याही पोस्टरवर दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे. या पोस्टरमध्ये मनसेचे निवडणूक चिन्ह, राज ठाकरे आणि अमित ठाकरे आहेत. त्यामुळे आता अमित ठाकरे सभेला संबोधित करणार का? या गोष्टीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.