29 C
Mumbai
Thursday, May 4, 2023
Homeताजी बातमी Ratnagiri: रस्त्यावर झोपून महिलांनी अडवली पोलिसांची वाट, बारसूतील रिफायनरी विरोधी आंदोलन तीव्र...

Ratnagiri: रस्त्यावर झोपून महिलांनी अडवली पोलिसांची वाट, बारसूतील रिफायनरी विरोधी आंदोलन तीव्र होण्याची शक्यता

राजापूर तालुक्यातील बारसू सोलगाव परिसरात माती परीक्षणासाठी आजपासून प्रस्तावित रिफायनरीसाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मात्र आता या परिसरात तणावाचे वातावरण आहे. रिफायनरीविरोधी महिला आंदोलकांनी पोलिसांची वाहने अडवली आहेत. त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. मुंबईतील रिफायनरी विरोधी संघटनेच्या अध्यक्षाला पोलिसांनी अटक केली आहे. सर्वेक्षण सुरळीत पार पाडण्यासाठी 1800 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. राजापूर बारसू सोलगाव येथे सर्वेक्षणाच्या कामाला वेग आला आहे. सर्वेक्षणासाठी लागणाऱ्या वस्तू घटनास्थळी आणण्यात आल्या आहेत. मात्र, या सर्व सर्वेक्षणाला स्थानिक ग्रामस्थांचा मोठा विरोध आहे. आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रिफायनरी सर्वेक्षणासाठी लागणाऱ्या मालाची वाहतूक करणाऱ्या गाड्या बारसू परिसरात दाखल झाल्या आहेत.

आज, मंगळवारी या ठिकाणी पुन्हा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या ठिकाणी आंदोलक महिला रस्त्यावर आडव्या आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी समजावूनही गावकरी घरी परतले नाहीत. ही एक तणावपूर्ण परिस्थिती आहे. खारघर आणि पेण येथून पोलिसांचा मोठा ताफा येथे दाखल झाला आहे. या सर्व ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी स्वत: लक्ष घालत आहेत. सोमवारी सायंकाळपासूनच या सर्व भागात स्थानिक ग्रामस्थ जमा झाले आहेत. आणि ते इथून हलायला तयार नाहीत. या सर्व प्रकारात काही ग्रामस्थ व विरोधक ऐकण्यास तयार नसल्याने पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. बारसू सोलगाव परिसराला अक्षरश: पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

सर्वेक्षणासाठी मोठा कंटेनरही परिसरात दाखल झाला आहे. सर्वेक्षणासाठी येणारे अधिकारी आणि पोलिसांच्या गाड्यांसमोर रिफायनरी विरोधी महिलांनी रस्त्यावरच पडून राहिल्याने मोठी अडचण झाली. जोपर्यंत सर्वेक्षण थांबत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलक महिलांनी घेतला आहे. या ठिकाणी पोलिसांनी ग्रामस्थांना समजावून सांगितले. पण त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. दरम्यान, या ठिकाणी दाखल झालेल्या माध्यमांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे. यापुढे जाऊन मनाई आदेशाचे उल्लंघन करू नका, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. या ठिकाणी उपस्थित माध्यम प्रतिनिधींनाही बाजूला करण्यात आले आहे.

राजापुरात सर्वेक्षणाची तयारी सुरू आहे. दुसरीकडे ग्रामस्थांचे आंदोलन सुरू आहे. मात्र या आंदोलनाबाबत एकही राजकीय नेता बोलायला पुढे आला नाही. विशेष म्हणजे या भागाचे आमदार राजन साळवी आहेत. तेही गेल्या काही दिवसांपासून परिसरात दिसत नव्हते. रिफायनरी प्रकल्पाबाबत सरकार ग्रामस्थांवर दडपशाही करत असल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »