Reserve Bank of India (RBI) ने देशातील वेगवेगळ्या सहकारी बँकेांवर (Bank) निर्बंध जारी केले आहेत. या बँकांनी निर्धारीत नियमांना महत्व न दिल्याने केंद्रीय बँकेने त्यांना दणका दिला आहे. या गोष्टीचा परिणाम खातेदारांवरही झाला आहे. खातेदारांना आता त्यांच्या बँक खात्यातून मोठी रक्कम काढता येणार नसून त्यांना आता एकावेळी फक्त १०,००० रुपये काढता येणार आहेत. या बँकांची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत बिकट असल्याने त्यांच्यावर आता कारवाई करण्यात आली. आरबीआईच्या माहितीनुसार, साईबाबा जनता सहकारी बँक, द सूरी फ्रेंड्स यूनियन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड, सूरी (पश्चिम बंगाल) आणि उत्तर प्रदेशातील बहराइच येथील नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव बैंक लिमिटेडवर हे सक्तीचे निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच बिजनोर येथील युनायटेड इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेला ही नियमांकडे दुर्लक्ष करणे महागात पडले आहे.
या बँकेच्या खातेदारांना आता खात्यातून रक्कम काढताना मर्यादांचा सामना करावा लागणार आहे. तसेच त्यांच्या त्यांच्या चिंतेत देखील भर पडणार आहे. यापूर्वी आरबीआयने राज्यातील रायगड सहकारी बँकेवर नुकतेच निर्बंध लावले आहेत. आरबीआय कडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील ६ महिन्यांपर्यंत या सहकारी बँकांवर हे निर्बंध कायम राहणार आहेत. बँकिंग विनियमन अधिनियम, १९४९ नुसार जारी निर्देशांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. तर सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेकडून नियम आणि मापदंडांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५७.७५ लाख रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
रिझर्व्ह बँके कडून रायगड सहकारी बँकेवर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे बँकेच्या ग्राहकाला प्रत्येकी कमाल १५००० रुपये काढता येणार आहेत. बँकेला नवीन कर्ज मंजुरी करता येणार नसून ठेव ठेवण्यासही बंदी घालण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर कोणत्याही जुन्या कर्जाचे बँकेला परत नुतनीकरण करता येणार नाही. गुंतवणूकदारांकडून नव्याने गुंतवणूक करण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोमवारी याविषयीचे निवेदन केले आहे, त्यानुसार, बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या बचत आणि चालू खात्यातून १५००० रुपयांहून अधिकची रक्कम काढता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. रायगड सहकारी बँकेवर हे निर्बंध पुढील सहा महिन्यांसाठी लागू करण्यात आले आहेत. निर्बंध करताना केंद्रीय बँकेने हे स्पष्ट केले आहे की, हे निर्बंध सहा महिन्यांसाठी बँकेवर लागू असतील तसेच हे निर्बंध म्हणजे रायगड सहकारी बँकेचे बँकिंग परवाना रद्द करण्यात येणार आहे असा होत नाही.