डोंबिवली (शंकर जाधव) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोटीने प्रवास करून डोंबिवलीत आल्याने नागरिकांनी नाराजी केली. तर डोंबिवली ज्या ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली त्या रस्त्याची पाहणी पालिका आयुक्तांनी केली नाही. पावसाळ्यापूर्वी रस्तातील खड्डे बुजवणे आवश्यक असताना पालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप होत आहे. वंचीत बहुजन आघाडीने नागरिकांच्या या समस्येकडे लक्ष देत बुधवारी सकाळी डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी झालेल्या एका रिक्षाचालकाने चक्क रस्त्यावर झोपून प्रशासनाचा निषेध नोंदवला.
वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मिलिंद साळवे, सुरेंद्र ठोके यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी डोंबिवली पूर्वकडील इंदिरा चौकात सरकारचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. काही वेळानंतर आंदोलनकर्ते डोंबिवली विभागीय कार्यालयासमोर अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आले असता एकही अधिकारी कार्यालयात आले नसल्याने आंदोलनकर्त्यांनी कार्यालयासमोर रस्ता रोको करत ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी झालेल्या रिक्षाचालकांपैकी एका रिक्षाचालकाने चक्क रस्त्यावर झोपून प्रशासनाचा जाहीर निषेध केला.

यावेळी मिलिंद साळवे म्हणाले, कल्याण – डोंबिवली म्हणगरपालिका हद्दीत रस्त्यांची चाळण झाली आहे. वास्तविक प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी रस्त्यातील खड्डे बुजवणे आवश्यक होते. मात्र प्रशासनाने यात लक्ष दिले नसल्याने रस्त्यात खड्डे अद्याप बुजले नाहीत.वाहनचालक जीव मुठीत धरून खड्ड्यातून वाहने चालवीत आहे. वंचीत बहुजन आघाडीने चार दिवसांपूर्वी पालिका प्रशासनाला आंदोलनाची माहिती दिली होती. बुधवारी आंदोलन करून निवेदन देण्यासाठी आले असता एकही अधिकारी कार्यालयात निवेदन घेण्यासाठी आले नाहीत. वंचीत बहुजन आघाडीच्या आंदोलनाची दखल प्रशासन घेत नसल्याने आम्ही कार्यालयासमोर रस्ता रोको करत ठिय्या आंदोलन केले.
दरम्यान, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना आंदोलन मागे घेण्याबाबत पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले.