मुंबई : एसी लोकलचे डबे नालासोपारा स्थानकात न उघडल्याने प्रवाशांना थेट विरारपर्यंत प्रवास करावा लागल्याची घटना सोमवारी रात्री घडली. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी मोटरमनला ट्रेनच्या केबिनमध्ये कोंडून ठेवण्याचा प्रकार घडल्याचे समजते. मात्र, मोटरमनला केबिनमध्ये कोंडल्याचा प्रकार घडला नसून संतप्त प्रवाशांनी मोटरमनला घेराव घातल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.
सोमवारी, ९ जानेवारीला रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास मुंबईहून विरारकडे जाणारी एसी ट्रेन नालासोपारा रेल्वेस्थानकात थांबली. मात्र, त्यावेळी ट्रेनचे दरवाजे उघडलेच नाहीत. त्यानंतर एसी लोकल विरार स्थानकात जाऊन थांबली. तेव्हा संतप्त प्रवाशांनी विरार स्थानकात चांगलाच गोंधळ घातला. तांत्रिक कारणाने लोकलच्या सहा डब्यांचे दरवाजे उघडले नसल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.
कल्याण मधील धक्कादायक घटना, सात वर्षीय मुलाची निर्घृण हत्या
पश्चिम रेल्वेवरील गर्दीमुळे आधीच प्रवास नकोसा होत असताना सोमवारी झालेल्या घटनेमुळे प्रवासी भयभीत झाले. त्यानंतर ही एसी लोकल विरार स्थानकात थांबली. त्यावेळी दरवाजे का उघडत नाही? या भीतीने प्रवाशांच्या संतापाचा भडका उडाला. संतप्त प्रवाशांनी एसी लोकलच्या मोटरमनला घेराव घातला. अवघ्या काही मिनिटातच रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न केला. रेल्वे पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मोटरमनच्या केबिन जवळील गर्दी पांगली.
दरवाजे का उघडले नाहीत?
पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एसी लोकलमधील ‘ट्रेन कंट्रोल मॅनेजमेंट सिस्टम’मधील बिघाडामुळे मोटरमनच्या बाजूने सहा डब्यांचे दरवाजे उघडले गेले नाहीत. मात्र, ही मानवी चूक नसून तांत्रिक बिघाड आहे. गार्डने दरवाजे उघडले, परंतु तांत्रिक बिघाडामुळे दरवाजे उघडले गेले नसल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.
डोंबिवलीतील भोईर जिमखाना महाराष्ट्र ऑलिम्पिक २०२३ मध्ये चमकला
घडलेला प्रकार मोटरमनच्या चुकीमुळे झाल्याचा आरोप संतप्त प्रवाशांनी करत विरार स्थानकात गोंधळ घातला. याबाबतची तक्रार काही प्रवाशांनी विरार स्टेशन मास्तरकडे केली. या गोंधळाची रेल्वेने तात्काळ दखल घेत चौकशीचे आदेश दिले. संबंधित चौकशीमध्ये विरारकडे जाणाऱ्या एसी लोकलच्या कोच क्रमांक ७०२८ सी बी ए आणि कोच क्रमांक ७०२६ सी बी ए यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत आवश्यक ती दुरुस्ती पश्चिम रेल्वेकडून करण्यात आली असून संबंधित कोचमध्ये ट्रेन नेटवर्क सर्किटचे कनेक्टर घट्ट करण्यात आले आहेत. यानंतर ही लोकल धावण्यास योग्य असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.