डोंबिवली ( शंकर जाधव ) धोकादायक इमारतीत भाडेकरू व इमारत मालकांमध्ये वाद हा कधीही न संपणारा आहे.यावर अनेक चर्चा करूनही यावर तोडगा निघाला नाही. पालिकेने धोकादायक इमारत जाहीर झाल्यावर भाडेकरूंच्या राहण्याचा प्रश्न सुटला नाही. यावर शिवसेनेने पुढाकार घेऊन भाडेकरूंना हक्काचा निवारा मिळावा यासाठी इमारत रिकामी करण्यापूर्वी भोगवटा प्रमाणपत्र त्यांना देण्यात यावे यासाठी कडक अंमलबजावणी कशी होईल याकडे महापालिकेने लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगत मागणीचे निवेदन पालिका आयुक्त दादासाहेब दांगडे यांच्याकडे केले आहे.
शिवसेनेचे नव निर्वाचित जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांची सोमवारी भेट घेत रस्त्यावरील खड्डे, धोकादायक इमारती आणि भाडेकरु यांच्यातील प्रश्न ,अभ्यासिका केंद्र आणि डोंबिवली येथील वाचनालयाचे प्रश्न त्वरित मार्गी लावावे अशी मागणी केली आहे.
कल्याण डोंबिवली शहर हे ऐतिहासिक, सांस्कृतिक, शैक्षणिक वारसा व वैभव लाभलेल्या कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात अनेक समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. या समस्या त्वरित मार्गी लागाव्या म्हणून यामध्ये गणेशोस्तव काही दिवसांवर आला असतानाही शहरातील बहुतांश रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे अपघात, वाहतूक कोंडी, धुळीचे साम्राज्य आणि यामुळे होणाऱ्या आजारामुळे नागरिक हैराण झाले आहेत. धोकादायक इमारतीमध्ये राहत असलेल्या भाडेकरूंना वाद विकोपाला जात असून यामध्ये विकासकाला अधिक फायदा होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे भाडेकरूंना हक्काचा निवारा मिळावा यासाठी इमारत रिकामा करण्यापूर्वी भोगवटा प्रमाणपत्र त्यांना देण्यात यावे यासाठी कडक अंमलबजावणी कशी होईल याकडे महापालिकेने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. स्पर्धा परीक्षा केंद्र चालू करावे जेणे करून हुशार विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीचा मार्ग सुकर होईल अशी मागणी करतानाच डोंबिवली पश्चिमेला जुने विष्णू नगर पोलीस ठाण्याच्या इमारतीमध्ये सुरू असलेले वाचनालयाची भाडेतत्त्वाच्या कराराची मुदत संपली असून ती पुढील वीस वर्षासाठी वाढवावी जेणे करून विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल अशी मागणी देखील त्यांनी त्यांच्या निवेदनात केली आहे.