अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्याप्रकरणी मुंबईतील वसई सत्र न्यायालयाने मंगळवारी शिझान खानला दिलासा दिला आहे. आपले केस कापू नयेत, तसेच तुरुंगात सुरक्षा द्यावी, अशी विनंती शिझानने न्यायालयाला केली होती. ही मागणी मान्य करत न्यायालयाने शिझानचे केस कापण्यास महिनाभर बंदी घातली आहे. यासोबतच त्याला कारागृहात सुरक्षा पुरविण्यात यावी आणि समुपदेशनही करण्यात यावे, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. शिझानच्या जामीन अर्जावर येत्या ७ जानेवारीला सुनावणी होणार आहे.
शिझानचे वकील शैलेंद्र मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, शिझानला न्यायालयीन कोठडी सुनावल्यावर त्याच्या कुटुंबीयांनी दोन याचिका दाखल केल्या, ज्यात त्यांचे म्हणणे आहे की, शिझान मानसिक तणावात आहे. अशा परिस्थितीत तो कोणतेही चुकीचे पाऊल उचलू शकतो. त्यामुळे त्याला सुरक्षा पुरवावी लागेल. याशिवाय केस न कापण्यासाठी आणखी एक अर्ज केला होता. न्यायालयाने त्यांचे हे दोन्ही अर्ज मान्य केले आहेत. पुढील महिनाभर कारागृहात शिझानचे केस कापू नयेत, असे आदेश न्यायालयाने तुरुंग प्रशासनाला दिले आहेत.
पठाण चित्रपटाबाबत नवा वाद समोर ; येथे करण्यात आली तोडफोड
शिझानला केस का कापायचे नाहीत?
शिझानने ‘अलिबाबा दास्तानें काबुल’ या टीव्ही मालिकेसाठी त्याचे केस वाढवले आहेत. या मालिकेत त्याचा लूक लांब केस असलेल्या हिरोचा आहे. जर शिझानचे केस कापले गेले, तर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो या मालिकेसाठी काही महिने शूटिंग करू शकणार नाही किंवा त्याला विग घालून काम करावे लागेल, अशी शक्यता आहे. याच कारणामुळे शिझानच्या वकिलाने त्याचे केस कापू नयेत, अशी विनंती न्यायालयाला केली होती.
शिझानने केल्या होत्या पाच मागण्या
शिझानने न्यायालयाकडे पाच मागण्या केल्या होत्या. त्याचे केस कापू नयेत, मीडिया ट्रायल करू नये, घरचे जेवण मिळावे, दम्यासाठी इनहेलर वापरण्याची परवानगी द्यावी व त्याला पोलीस संरक्षण देण्यात यावे. यापैकी बहुतांश मागण्या कोर्टाने मान्य केल्या आहेत.