देशात येत्या चार-पाच दिवसात उष्णतेच्या लाटे चा अंदाज भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) वर्तविला आहे. विदर्भात देखील उष्णतेच्या लाटेची झळ पोहोचणार असून विदर्भाला देखील अलर्ट देण्यात आल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉक्टर सखा सानप यांनी दिली आहे. वर्धा, चंद्रपूर, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हा अलर्ट नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने जारी केला आहे. या भागातील नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये तसेच सतत पाणी, पन्हे ,ओ आर एस, ताक अशा गोष्टींनी स्वतःला हायड्रेट ठेवावे असाही सल्ला देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात एप्रिलच्या सुरुवातीपासूनच पारा ४४ अंश सेल्सिअस पर्यंत गेला होता तर आता उत्तर भारत, मध्य भारत येथे देखील मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट असून उत्तर आणि मध्य भारतातून येणाऱ्या कोरड्या आणि उष्ण वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रावर देखील होणार असल्याची माहिती डॉक्टर सानप यांनी दिली.
तसेच परभणीत देखील उन्हाचा पारा ४३.७ जाऊन पोहोचला आहे. काल म्हणजेच बुधवारी यावर्षीच्या उन्हाळ्यातील सर्वात उच्चांकी ४३ अंश तापमानाची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानात विभागात करण्यात आली होती.
त्या पाठोपाठ दुसऱ्या दिवशी या तापमानात वाढ होऊन ४३.७ अंश अशी नोंद करण्यात आली उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे शहरातील बाजारपेठ यांसह रस्त्यांवर शुकशुकाट होता. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. तसेच नागरिकांनी घरोघरी कुलर व एसी बसवले आहेत. वाढत्या उन्हामुळे कुलर विक्रेत्यांच्या दुकानातून कुलर खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे, त्यामुळे कूलर एसी विक्रेत्यांच्या व्यापारात मात्र समाधानाचे वातावरण पाहावयास मिळाले आहे.
पुढचे दोन तीन दिवस उन्हाचा पारा असाच राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून यामुळे नागरिक मात्र चांगलेच त्रासून जाणार आहेत.