डोंबिवली (शंकर जाधव)
देशाच्या आर्थिक स्थितीत बँकेचे योगदान अधिक असल्याने ठेवीदारांची गुंतवणूक आणि कर्ज यावर बँकेची उलाढाल दिसते. आपली बचत उद्याची गुंतवणूक होऊ शकते, आर्थिक कोंडीतून सुटण्याचा एक मार्ग असू शकतो या उद्देशाने बँकेत खाते उघडले जाते. शालेय जीवनात बचतीचे महत्व आणि सवय लागण्यासाठी बँकेच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी डोंबिवलीतील जनगणमन शाळेने पाऊल टाकले. प्रत्यक्ष शाळेत जेएमएफ चिल्ड्रन स्मॉल बँक
येत्या ३ तारखेला सुरु होणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी फक्त २० रुपये जमा करून बँकेत बचत खाते उघडू शकतात.
डविद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना सुरु केलेल्या या बँकेचे सर्व कामकाज या शाळेतील विद्यार्थी पाहणार आहेत. बँकचे व्यवहार कसे असतात, खाते कसे उघडले जाते,व्याज, मुद्दल, चक्रवाढ व्याज,बचत खाते, सुरक्षा ठेव, मुदत ठेव, यांची विद्यार्थ्यांना माहिती दिली आहे. यासाठी युनियन बँकेने पुढाकार घेतला असून खाते उघडणाऱ्या विद्यार्थ्यांना पास बुक दिले जाणार आहे. यात विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या रक्कम लिहिली जाणार आहे. बँकेत खाते उघडताना पालकांचा मोबाईल नंबर जोडला जाणार आहे. त्यामुळे आपल्या मुलाने बँकेत किती रक्कम जमा केली ? किती रक्कम काढली ? त्याच्या खात्यात किती रक्कम शिल्लक आहे यांची माहिती मोबाईल द्वारे मिळणार आहे अशी माहिती जेएमएफचे अध्यक्ष डॉ.राजकुमार कोल्हे यांनी दिली. यावेळी सचिव प्रेरणा कोल्हे, फाउंडेशन जान्हवी कोल्हे आदि उपस्थित होते.
डोंबिवली पश्चिमेकडील जुनी डोंबिवली येथील जनगणमन शाळेत बँकेचे कामकाज आठवड्यातून दोन दिवस शाळेच्या वेळेत शून्य तासात केले जाणार आहे. प्रत्येकाला रोटेशच्या आधारावर पद दिले जाणार आहे.त्यात विद्यार्थ्यांना संचालक मंडळ,मुख्य कार्यकारी अधिकारी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सरव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, प्रमुख अधिकारी, संकलन अधिकारी, लिपिक कर्मचारी सदस्य, लिपिकेतर कर्मचारी सदस्य अशी पदे देण्यात आली आहेत.