
डोंबिवली ( शंकर जाधव ) ओला कार बुक करून त्यातुन प्रवास करताना दूरवर गेल्यावर रिक्षाची कट लागण्याचा बहाना करत कारचालकाशी वाद घालतात. कार मध्ये बसलेले प्रवासीही रिक्षाचालकाच्या कटात शामिल असल्याने तेही कार चालकाला दमदाटी करतात. त्याच्याकडील पैसे व मोबाईल घेऊन पसार होतात अशा प्रकारे लुट होण्याच्या घटना घडल्याने पोलिसांनी टोळीला अटक करण्यासाठी तपास सुरु केला. पोलिसांच्या तपासाला यश आले असून टोळीतील तीन जणांना बेड्या ठोकून जेरबंद केले.यातील एकाचा पोलीस शोध घेत असून एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत उर्फ मोठा चंद्या रमेश जमादार, शिवा रुपिपाल तुसंबल आणि सत्यप्रकाश मुकेशकुमार कनोजिया अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक आरोपींनी चोरीच्या गुन्ह्यातील रोख रक्कम, मोबाईल, लॅपटाॅप,व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असे एकूण २ लाखाचा ऐवज हस्तगत ककरण्यात आला आहे. अटक आरोपींवर खून , दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, दुखापत, सरकारी नोकरास दुखापत, अवैध शस्त्रे बाळगणे अशा प्रकारची गुन्हे डोंबिवली रामनगर, टिळकनगर, खडकपाडा व हिललाईन पोलीस ठाण्यात दाखल आहेत. आरोपी हे रिक्षात बसून रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना कट मारून वाहनचालकाशी वाद घालून त्यांना लुटण्याचे व रिक्षात एक प्रवासी बसवून त्याला निर्जळ ठिकाणी नेऊन लुटत होते. या आरोपींना अटक करून मानपाडा पोलिसांना दोन गुन्हे उघडीकीस आणण्यास यश आले आहे. २४ मार्च रोजी फिर्यादी राजन चौधरी ( ओला कारचालक ) हे गोवंडी येथून नेवाळी नाका आले असता त्यांनी रात्रीच्या वेळी तीन प्रवाशांना घेऊन डोंबिवलीच्या दिशेने निघाले. डोंबिवली पूर्वेकडील घरडा सर्कल येथे एका रिक्षाने त्याच्या कारला कट मारून समोर उभी केली. चौधरी यांनी रिक्षाचालकाला याचा जाब विचारला असता रिक्षाचालक व त्याच्या कारमधील तीन प्रवाशांनी त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. चौधरी यांच्याकडील रोख रक्कम व कारमधील मोबाईल घेऊन टोळी रिक्षात बसून पसार झाले.चौधरी यांनी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अटक आरोपीवर गुन्हा दाखल झाला.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वपोनी शेखर बागडे यांच्या मार्गददर्शनाखाली पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) बाळासाहेब पवार, सपोनि सुरेश डांबरे, अविनाश वनवे, सुनील तारमाळे, सपोउपनि भानुसाद काटकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास माळी,सुनील पवार, संजय मासाळ,गिरीश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अशोक आहेर, विजय आव्हाड यांनी केली.