केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील टोल माफ करण्याची मोठी घोषणा केली आहे. राज्यसभेत बोलताना नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली असून त्यामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नितीन गडकरी म्हणाले की, १० किमीचा रस्ता वापरण्यासाठी लोकांना ७५ किमीचा टोल भरावा लागतो. हा मागील सरकारचा दोष असल्याचे देखील त्यांनी म्हंटले आहे.
राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी नितीन गडकरी उभे राहिले. शहराच्या हद्दीत एक्स्प्रेस वेवर टोलनाके उभारण्याचा मुद्दा राज्यसभेत सदस्यांनी उपस्थित केला. प्रवासादरम्यान स्थानिक नागरिकांनाही टोल भरावा लागत असल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. यावेळी गडकरी यांनी शहरातील टोल माफ करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
“सुदैवाने किंवा दुर्दैवाने, पण मी एक्स्प्रेस वे टोलचा ‘फादर ऑफ टोल टॅक्स’ आहे. मीच या देशात पहिला बीओटी प्रकल्प आणला. महाराष्ट्रातील ठाणे भिवंडी बायपास हा पहिला प्रकल्प होता. आता आम्ही एक नवीन प्रणाली सुरू करत आहोत, ज्यामध्ये टोलमधून शहरी भाग वगळण्यात येईल, त्यांच्याकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.”
ते पुढे म्हणाले, शहरातील लोकांकडून कोणताही अधिभार घेतला जाणार नाही. कारण १० किमीचा रस्ता वापरण्यासाठी त्यांना ७५ किमीचा टोल भरावा लागतो. यावर एक खासदार म्हणाले हे अत्यंत चुकीचे आहे. त्यावर गडकरींनी उत्तर देत ”यात माझी चूक नाही, ही चूक आधीच्या सरकारची आहे. पण आम्ही ती दुरुस्त करू. तुम्हाला जसं वाटतंय तसंच मलाही वाटतंय. आम्ही लवकरच सगळं दुरुस्त करू.” असे म्हणाले आहेत.