डोंबिवली ( शंकर जाधव )
सर्व कागदपत्राची पुर्तता केलेल्या युवा उद्योजकाला जर बँक कर्ज देण्यासाठी वारंवार हेलपाटे मारण्यास भाग पाडत असेल व त्याचे खच्चीकरण करत असेल तर अशा युवा उद्योजकांच्या पाठीशी शिंदे – फडणवीस सरकार उभे असून अशा बँकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी डोंबिवलीत एका कार्यक्रमात दिला.
कार्यक्रमात पुढे बोलताना मंत्री सामंत म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला शब्द दिला आहे की उद्योजकांच्या प्रगतीसाठी व त्यांना बळ देण्यासाठी तुम्ही जो शब्द द्याल तो मी दिला आहे असे समजेन व आपण तो पूर्ण करू असे सांगितले. एक संकल्प करत असल्याचे सांगत महाराष्ट्रातील उद्योजकाला कुठलाही त्रास होणार नाही हे उद्योग खात्यातील अधिकाऱ्यांनी आपली जबाबदरी समजून काम केले पाहिजे त्यावर आमचे नियंत्रण देखील असेलच. उद्योजकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी उद्योजकांची एक समिती स्थापन केली जाईल व लवकरच त्यावर निर्णय घेतला जाईल असे सांगितले. तत्कालिन मंत्र्यांनी येथील कंपन्या स्थलांतरित करण्याचा जो निर्णय घेतला होता तो नेमका काय आहे ते तपासावे लागेल. यासंदर्भात येथील उद्योजकांशी बोलावे लागेल. जर खरोखर यात तथ्य असेल तर पाऊल उचलावे लागेल. वेदांताची हाय कमिटीची मीटिंग सहा महिन्यांपूर्वी लावणे गरजेचे होते पण ती मीटिंग लावली गेली नाही. मुख्यमंत्र्यांनी ती मीटिंग दोन महिन्यांपूर्वी लावली. मात्र आधीच सहा महिने त्यांना उशीर केल्याने त्यांनी प्रतिसाद दिला नाही. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ येथील बंद झालेले कारखाने गुजरातला जाऊ देणार नाही. जर काही कारखाने आजारी झाले असतील तर त्यांना पुन्हा नव्याने ऊर्जा देण्याचे काम प्रशासनातर्फे करण्यात येईल. गर्व से कहो हम हिंदू है हा नारा मुख्यमंत्र्यांनी आता अचानक दिलेला नाही. हा नारा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिला होता मात्र गेल्या अडीच वर्षात हा नारा काही जण तो नारा विसरले आहेत. महाराष्ट्राबाहेर गेलेल्या प्रकल्पाची यादी लवकरच जाहीर करणार असल्याचेही मंत्री सामंत यांनी सांगितले.
उदय सामंत ठरले कामा येथील उद्योजकांना भेटणारे पहिले मंत्री
कामगार किंवा उद्योजकांच्या असोसिएशनचे प्रश्न मंत्रालयाच्या केबिनमध्ये बसून सोडवण्यापेक्षा प्रत्यक्षात असोसिएशनच्या कार्यालयात बसून सोडवणे महत्त्वाचे आहे. मंत्री त्यांच्या घरातला आहे अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. या उद्देशाने मी आज कामा संघटनेला भेट दिली. मात्र कामा संघटनेला त्यांच्या कार्यालयात येऊन भेट देणारा पहिला उद्योग मंत्री ठरलो आहे. कालपासून जे सारखे टीका करत आहेत त्यांनी सांगावं की कितीवेळा ते या ठिकाणी आले. त्यामुळे नुसती टीका करण्यापेक्षा आपली जबाबदारी स्वीकारली तर काम सोपे होते. तीच जबाबदारी घेत मी त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आलो आहे. कामगारांना भविष्यात न्याय देण्यासाठी योग्य भूमिका शिंदे आणि फडणवीस सरकार घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी कामा संघटनेच्या भेटीदरम्यान दिले. यावेळी कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी, कमल कपूर, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन उपस्थित होते.