पुणे व खारघर नंतर आता उल्हासनगर (Ulhasnagar) येथे शिवसैनिकांनी गोंधळ घातला आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून संयम दाखवत असलेले उल्हासनगरमधील शिवसैनिकांचा (Shivsena) ताबा सुटला व संतापलेल्या शिवसैनिकांनी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shine) यांच्या उल्हासनगरमधील कार्यालयात दगडफेक केल्याची बातमी समोर आली आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उल्हासनगरमधील शिवसैनिकांनी संयमाची भूमिका घेतली होती. या बंडाला शिवसेनेतील ४० आमदारांचा पाठिंबा आहे. असे असताना उल्हासनगरचे उपशहरप्रमुख अरुण आशा यांनी चौकात ते एकनाथ शिंदेंना पाठिंबा देत असल्याचे बॅनर लावण्यात आले होते. एकनाथ शिंदे व त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी ठाण्यानंतर उल्हासनगर हे महत्वाचे शहर आहे. उल्हासनगरमधून त्यांना चांगली मते मिळाली होती. परंतु शिंदेंनी केलेल्या बंडामुळे श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे. या घटनेमुळे उल्हासनगर मध्ये खळबळ उडाली आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतरचा पहिला उघड निषेध त्यांच्या मतदारसंघातील उल्हासनगर येथे झाला, जिथे त्यांचा मुलगा खासदार आहे. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरून चार ते पाच जणांना अटक केली आहे.