महाड :
महाड तालुक्यातील रामदास पठार गावामध्ये गेली अनेक वर्ष सुरू असलेली वस्तीची एस.टी. बस सेवा पुन्हा पूर्ववत करावी अशी मागणी रामदास पठार आणि परिसरातील ग्रामस्थांनी केली. सकाळी मागणी करताच संध्याकाळी गावामध्ये गाडी आल्याने ग्रामस्थांच्या लढ्याला यश आले असे म्हणायला हरकत नाही.

महाड तालुक्यातील रामदास पठार गावामध्ये गेली अनेक वर्ष महाड रामदास पठार ही रात्रीची वस्तीची एस.टी. बस सेवा सुरू होती, मात्र पुरेसे प्रवासी मिळत नसल्याने एस.टी. महामंडळाच्या महाड आगाराने ही बस बंद केली होती. शिवाय वस्तीला गेलेल्या चालक वाहकांना राहण्याची आणि पिण्याच्या पाण्याची देखील सुविधा उपलब्ध नव्हती. ही समस्या वाहक चालकांकडून ग्रामस्थांपर्यंत गेल्यानंतर ग्रामस्थांनी गावामध्ये दोन रूम बांधून घेतले आहेत. त्यानुसार आता रात्रीची वस्तीची बस सुरू करावी अशी मागणी ग्रामस्थांनी अनेक वेळा केली. एस.टी. महामंडळाच्या महाड आगाराने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज रामदास पठार ग्रामस्थांनी महाड एस.टी. आगाराचे आगार प्रमुख फुलपगारे आणि शिवाजी जाधव यांची भेट घेऊन एस.टी. बस सेवा पुन्हा सुरू करावी अशी मागणी केली. यावेळी रामदास पठार ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, आजी व माजी सरपंच उपस्थित होते. ग्रामीण भागामध्ये रात्री जाणाऱ्या एस.टी.च्या चालक वाहकांना किमान राहण्याची आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था असावी, मात्र अनेक गावांमध्ये तशी व्यवस्था मिळत नसल्याने एसटीच्या रात्रीच्या बस फेऱ्या बंद असल्याचे पुढे आले आहे.
ग्रामस्थांनी केलेल्या मागणीचा विचार करून वरिष्ठांच्या आदेशानुसार बंद असलेली एसटी बस फेरी पुन्हा सुरुवात करण्याबाबत विचार केला जाईल
– फुलपगारे, आगारप्रमुख, महाड