ठाणे : सृजनसंवादतर्फे प्रकाशित निर्मला आलेगावी-कुप्पस्त लिखित ‘व्यक्त’ कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवारी सायंकाळी सहा वाजता पार पडला. सृजनसंवाद प्रकाशनच्या फेसबुक पेज आणि यूट्यूबच्या माध्यमातून हा सोहळा पार पाडण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तपस्या नेवे यांनी केले. यावेळी कार्यक्रमात उपस्थित डॉ. महेश केळुसकर, प्रा. प्रतिभा सराफ, सृजनसंवाद प्रकाशनाचे संपादक गीतेश शिंदे, प्रकाशिका सोनाली गजानन शिंदे या सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले, तर उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
ठाण्याच्या सृजनसंवाद प्रकाशनाने हे पुस्तक प्रसिद्ध केले असून, याप्रसंगी सृजनसंवाद प्रकाशनचे संपादक गीतेश शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना त्यांच्यावर झालेल्या पूर्वसूरींच्या संस्कारांचा उल्लेख केला. समकालातील कवींबरोबर काव्य जाणिवा पडताळून पाहणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. निर्मला यांच्या कविता अनेक वर्ष डायरीत बंदिस्त होत्या. माझ्याकडे त्या वाचनासाठी आल्या तेव्हा त्यातील आशय विखुरलेल्या स्वरूपात होता. मला कसदार माती मिळाली. त्यातून जी एक मूर्ती घडवली गेली ती म्हणजे ‘व्यक्त’ हा कवितासंग्रह.
“कविता ही अंतर्मुख करून स्वतःकडे पहायला शिकवते, आपल्या आतील बदल जाणवून ते व्यक्त करत असते. निर्मला कुप्पस्त यांची कविता पुरुष सत्तेविषयी बंड करते व अंतर्मुख होऊन स्त्रीत्वाची चिकित्सा करते,” असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी, लेखक डॉ. महेश केळुसकर यांनी केले. “कवयित्री निर्मला आलेगावी कुप्पस्त यांच्या ‘व्यक्त’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करताना डॉ. केळुसकर बोलत होते. कोणत्याही कवितेला स्त्रीवादी किंवा विशिष्ट लेबल न लावता कविता म्हणूनच पाहिले पाहिजे. ही कवयित्री कवितेकडे आर्त विनवणी करते आहे व कवितेची साथ, सोबत घेऊन पुढे चालली आहे. कविता ही परिपक्वतेकडे घेऊन जाणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी काळ जावा लागतो,” असेही ते म्हणाले.
कार्यक्रमातील प्रमुख अतिथी प्रा. प्रतिभा सराफ म्हणाल्या, “या पुस्तकातील बहुतेक कविता अलंकारांशिवाय आंतरिक सौंदर्याने नटलेल्या, साध्या पण सकस मुक्तछंदातील व अल्पाक्षरी आहेत. त्या निखळ काव्यानंद देतात. कवयित्रीचा कल कल्पनाविलासापेक्षा वास्तववादी कवितेकडे आहे. काही कवितांमधून त्याविषयी अनेक हृद्य भावना व्यक्त झाल्या आहेत. निसर्ग प्रतिमांचा भरभरून उपयोग केला आहे. कवयित्रीचा हा पहिला कवितासंग्रह असला, तरी यात नवखेपणाच्या खुणा नाहीत तर नवेपणाच्या काव्य जाणिवा आहेत.”
या कवितासंग्रहाला कविवर्य अशोक बागवे सरांचा ब्लर्बरूपी आशीर्वाद लाभला आहे. तसेच याचे मुखपृष्ठ अश्विनी खटावकर यांनी साकारले आहे. शिंदे पुढे म्हणाले की, ‘या कवितेत कुठलीही पोज नाही. मनावरची आक्रंदने उत्स्फूर्तपणे टिपली आहेत. निसर्ग, प्रेम, विरह या काव्य जाणिवा अल्पाक्षरी कवितेत आहेत.’ सृजनसंवाद प्रकाशनाचे हे तिसरे पुस्तक असून, याआधी प्रकाशित झालेल्या माैनाचा नि:शब्द कोलाहल, पाणंद या दोन पुस्तकांना रसिकांचा प्रतिसाद मिळत आहे.
निर्मलाताईंचा ‘व्यक्त’ हा काव्यसंग्रह देखणा झाला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अतिशय चांगल्या आणि वेगळ्या कविता या संग्रहात आहेत!