डोंबिवली (शंकर जाधव) : पायी चालण्यास राखीव जागा असलेल्या फुटपाथ नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत.डोंबिवलीतील अनेक फुटपाथवर झाकण नसल्याने गटारात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. डोंबिवली पूर्वेकडील ९० फीट रोडवरील एका शाळेसमोरील फुटपाथवर झाकण नसल्याने एका ५० वर्षीय इसम पडून जखमी झाल्याची घटना १९ तारखेला सायंकाळच्या सुमारास घडली. यात इसमाच्या पायाला १७ टाके पडले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. जवळच शाळा असल्याने फुटपाथ हे विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरले असून प्रशासनाने वेळीच यावर लक्ष देणे आवश्यक आहे.
डोंबिवली पूर्वेकडील ९० फिट रोडवरील एका शाळेसमोरील फुटपाथवरून सुंदरम अय्यर हे ५० वर्षीय इसम पत्नीबरोबर चालत होते. येथील फुटपाथवर झाकण नसल्याने अय्यर हे गटारात पडले. यात त्यांच्या पायाला जखम झाली असून पायातून रक्त पडत असल्याने पत्नीने व नागरिकांनी त्यांना गटारातून बाहेर काढले.अय्यर यांना जवळील एका खाजगी रुग्णालयात दाखल केल्याने त्यांच्यावर उपचार सुरु झाले. बालाजी आंगण येथील अय्यर यांच्या पायाला १७ टाके पडले असून काही ठिकाणी जखमा झाल्या आहेत.तर समोरच शाळा असल्याने विद्यार्थी फुटपाथवरून चालत शाळेत जात असतात. मात्र प्रशासनाने यावर लक्ष दिले नसल्याने एका नागरिकाला याचा फटका बसला.
याबाबत अय्यर यांना विचारले असता ते म्हणाले,फुटपाथ हे नागरिकांना चालण्यासाठी प्रशासनाने सोय करून दिली आहे. मात्र फुटपाथवर झाकण नसल्याने गटारात पडून जखमी झालो. मात्र प्रशासनाने लक्ष देऊन डोंबिवलीतील प्रत्येक फुटपाथवर तुटलेली झाकणे व काही ठिकाणी झाकणेच नसतात अश्या फुटपाथवर झाकणे लावणे आवश्यक आहे.एखादे लहान मुल जर फुटपाथवरील झाकण नसलेल्या गटारात पडले तर याची जबाबदारी प्रशासन घेईल का ? पुढील धोका टाकण्यासाठी पालिका प्रशासनाने वेळीच लक्ष दिले पाहिजे.
भाजपचे माजी नगसेवक साई शेलार आणि भाजप डोंबिवली शहर सचिव राजू शेख यांनी या घटनेची दाखल घेऊन बांधकाम विभागातील उपअभियंता यांना पत्र दिले आहे. डोंबिवली पूर्वेकडील ९० फिट रोडवर फुटपाथवर झाकणे लावणे आवश्यक आहे. झाकणे नसल्याने गटारात पडून बालाजी आंगण येथील एका रहिवासी पडून जखमी झाल्याची घटना घडली आहे.प्रशासनाने फुटपाथवरील झाकणे लवकरात लवकर लावावी जेणेकरून कोणी गटारात पडून जखमी होणार नाही. दरम्यान घटनेची माहिती मिळताच प्रशासना जागे झाले. संबधित विभागातील कर्मचारी वर्गाने येथील फुटपाथवरील झाकणे लावल्याचे काम सुरु केले.