यवतमाळमधील नेते संजय देशमुख यांनी गुरुवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधले. संजय देशमुख हे शिंदे गटातील मंत्री संजय राठोड यांचे राजकीय विरोधक आहेत. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखडी मतदारसंघातील त्यांचे विरोधक म्हणून ओळखले जाणारे संजय घाडीगावकर यांनीही त्यांच्या १५० समर्थकांसह काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन गुरुवारी शिवसेनेच्या ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला.
मेळाव्यासाठी तुम्ही तारीख ठरवा. मी आलोच – उद्धव ठाकरे
संजय देशमुख यांच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे बंडखोर आमदार संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. दरम्यान, संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर पक्षविस्ताराच्या दृष्टीने ठाकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली. ‘मी पोहरा देवीचे दर्शन घेण्यासाठी नक्की येणार आहे. मेळाव्यासाठी तुम्ही तारीख ठरवा. मी आलोच’, असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
संजय घाडीगावकर हे मूळचे शिवसैनिक असून या प्रवेशाच्या निमित्ताने त्यांनी पुन्हा घरवापसी केली आहे. या पक्ष प्रवेशाच्यावेळी घाडीगावकर यांनी केलेल्या विनंतीनुसार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यता जाहीरसभा घेण्याचे आश्वासन दिले असून ही सभा दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने ठाकरे गटाने आता ठाणे शहरात पक्षाची ताकद वाढविण्यास सुरुवात केल्याचे चित्र असून घाडीगावकर यांचा पक्षाला किती फायदा होतो, हे येत्या काळात स्पष्ट होईल.